सोलापूर -: महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2022 च्या प्रभाग क्र. 10 आणि 11 च्या प्रारूप नकाशा व व्याप्तीबाबत हरकत घेतली असून प्रारूप प्रभाग क्र. 10 मधील अभौगोलिक भाग व परिसर, कमी करून तो कमी केलेला भाग व परिसर प्रभाग क्र. 11 मध्ये समाविष्ट करावा, अशी लेखी हरकत छावाचे योगेश पवार यांनी राज्य निवडणूक आयुक्त, महापालिका आयुक्त आणि निवडणूक कार्यालय, सोलापूर यांचेकडे घेतली आहे.
याबाबत सविस्तर हकीकत अशी की, सार्वत्रिक निवडणूक 2022 साठी करण्यात आलेली प्रारूप प्रभाग रचना हि सदोष असून प्रारूप प्रभाग रचनेवर राजकीय पक्ष व चालू नगरसेवकांचा हस्तक्षेप झालेल्या असून प्रभाग क्र. 10 आणि 11 याची भौगोलिक परिस्थिती, हद्दीतून जाणारा रेल्वेमार्ग/लोहमार्ग आणि बोगदा, प्रभागातून जाणारे प्रमुख मोठे रस्ते आणि प्रभागातील लोकसंख्येचा विचार न करता प्रभाग क्र. 10 आणि 11 ची बेकायदेशीरपणे अभौगोलिक प्रभाग रचना केलेली आहे. तसेच प्रभाग क्र. 10 आणि 11 ची प्रारूप प्रभाग रचना करताना राज्य निवडणूक आयोगाने दि. 03 मे 2005 रोजी दिलेल्या आदेशाचे आणि महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाचे सरार्सपणे उल्लंघन केल्याचे हरकतीमध्ये म्हटले आहे.
प्रभाग क्र. 10 मध्ये समाविष्ट असणारा परिसर रेल्वेमार्ग/लोहमार्गामुळे दोन भागात विभागलेला असून 86 टक्के लोकसंख्येचा भाग व परिसर लोहमार्गाच्या पश्चिमेकडील आहे, तर फक्त 14 टक्के लोकसंख्येचा भाग व परिसर लोहमार्गाच्या पूर्वेकडील आहे. थोडक्यात, प्रारूप प्रभाग क्र. 10 हा लोहमार्गाच्या पश्चिमेकडे 86 टक्के, तर पूर्वेकडे 14 टक्के याप्रमाणे नैसर्गिक व भौगोलिक दृष्ट्या स्पष्ट व ठळकपणे विभागलेला आहे. त्यामुळे सदरची रचना बेकायदेशीर आहे. त्यामुळे प्रारूप प्रभाग क्र. 10 मधील लोहमार्गाच्या पूर्वेकडील भाग व परिसर, प्रभाग क्र. 10 मधून कमी करून सदरचा भाग व परिसर प्रभाग क्र. 11 मध्ये समाविष्ट करून प्रभाग क्र. 10 व प्रभाग 11 ची नियमाप्रमाणे भौगोलिक दृष्टया सलग व Compact पध्दतीने नव्याने प्रभाग रचना करण्यात अशी मागणी योगेश पवार यांनी केलेली आहे.
तसेच प्रभाग क्र. 11 हा वार्ड लोकसंख्येच्या दृष्टीनेही बेकायदेशीर असल्याचे नमूद करून प्रभाग रचना करताना राज्य निवडणूक आयोगाच्या लोकसंख्ये बाबतच्या नियमांचे पालन केलेले नाही. कारण नियमाप्रमाणे प्रभाग क्र. 11 ची लोकसंख्या ही कमीत-कमी 22737 इतकी पाहिजे. असे असतांनाही प्रभाग क्र. 11 चा लोहमार्गा पर्यंतचा सलग भाग व परिसर तोडून तो भाग प्रभाग क्र. 10 मध्ये समाविष्ट केल्यामुळे प्रभाग क्र. 11 ची लोकसंख्या कमीत-कमी पेक्षाही कमी झालेली आहे. त्यामुळे प्रभाग क्र. 10 चा लोहमार्गाच्या पूर्वेकडील जवळपास 3800 लोकसंख्या असणारा भाग व परिसर प्रभाग क्र. 11 मध्ये जोडण्याची मागणी केली आहे.
प्रारूप प्रभाग क्र. 10 मधील लोहमार्गाच्या पूर्वेकडील भाग व परिसर, प्रभाग क्र. 10 मधून कमी करून सदरचा भाग व परिसर प्रभाग क्र. 11 मध्ये समाविष्ट करून प्रभाग क्र. 10 आणि प्रभाग 11 ची नियमाप्रमाणे भौगोलिक दृष्टया सलग व Compact पध्दतीने रचना करण्याची मागणी हरकती अर्जामध्ये केली आहे. तसेच हरकती अर्जानुसार प्रभाग क्र. 10 आणि 11 च्या प्रभाग रचनेत बदल नाही केल्यास हायकोर्ट, मुंबई यांचेकडे दाद मागण्याचा इशारा योगेश पवार यांनी दिलेला आहे.

















