सोलापूर : सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष म्हणून धवलसिंह मोहिते-पाटील यांची एन्ट्री. त्यामुळे काँग्रेसला चांगले दिवस येतील अशी चर्चा सुरू झाली त्या पद्धतीने सुरवातीचे दोन-तीन महिने धवलसिंह मोहिते यांनी जिल्ह्यात दौरे केले, आढावा घेतला, बैठका घेतल्या, पदाधिकारी निवडी साठी मुलाखती घेतल्या. त्यानंतर बसवराज बगले यांनी केलेले नेत्यांविरोधात आंदोलन. यामुळे नेत्यांची प्रतिमा मलिन झाली त्याचा फटका बगले यांना बसला.साहेबांनी जनवात्सल्य निवासस्थानी बोलावून झापले, झापल्याचा राग मनात धरून बगले यांनी काँग्रेसचा हात सोडून घड्याळ हातात बांधले. नक्कीच या सर्व घडामोडींत मागे कोणाचा तरी हात असावा असा संशय काँग्रेसमध्ये व्यक्त करण्यात आला.
या पार्श्वभूमीवर जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते-पाटील यांनी जिल्ह्याच्या पदाधिकार्यांच्या निवडी केल्या. अकरा तालुका अध्यक्ष नेमले, विशेष म्हणजे जिल्ह्यातील दोन कार्यकारी अध्यक्षपदे त्यांनी काढली. सुरेश हसापुरे यांना वरिष्ठ उपाध्यक्ष पद दिले, यावरून हसापुरे यांचा तिरस्कार किती आहे याची चर्चा आता सुरू झाली आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये आठ प्रमुख पदे देण्यात आली आहेत त्यामध्ये काँग्रेस भवनात यापूर्वी कधीही न दिसलेले पक्षविरोधी काम करणारे अशा लोकांना मोठी पदे देण्यात आल्याची चर्चा आता काँग्रेस भवनातून ऐकण्यास मिळत आहे. काँग्रेस मध्ये येऊन एक महिना सुद्धा झाला नाही अशा रमेश हसापुरे सारख्या नवख्या कार्यकर्त्याला जिल्हा संघटक हे पद मोठे दिले यावरून ही सुरेश हसापुरे यांच्याबाबतचा तिरस्कार दिसून येतो. भीमाशंकर जमादार, राधाकृष्ण पाटील, अशोक देवकते, मोतीलाल चव्हाण, मल्लेश बिडवे, सुधीर लांडे, भीमराव बाळगे यांना मोठ्या पदावर संधी देण्यात आली आहे. यातील काही नेते तर भाजपचे नेते सिद्रामप्पा पाटील यांचे कट्टर समर्थक आहेत, सिद्धाराम म्हेत्रे यांच्या विरोधात काम करणारे असल्याची कुरबुर म्हेत्रे समर्थकांकडून ऐकण्यास मिळते. बसवराज बगले यांच्या मागेपुढे करणाऱ्या कार्यकर्त्यांना मोठ्या पदाचे वाटप झाले असून पदे निवडीपाठीमागे बसवराज बगले यांचाच ‘हात’ असल्याची चर्चा आता काँग्रेस भवनात ऐकण्यास मिळत आहे. दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघावर डोळा ठेवून जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते-पाटील यांनी सर्वाधिक पदे दक्षिण तालुक्याला दिली आहेत हे या निवडीवरून स्पष्ट होते मात्र नुकत्याच झालेल्या नगरपंचायत निवडणुकीमध्ये माळशिरस तालुक्यात एकही काँग्रेसचा नगरसेवक निवडून आला नाही त्या तालुक्यात काँग्रेस मजबूत करण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे होते परंतु त्याकडे दुर्लक्ष झाल्याचं बोललं जात आहे.


















