मोहोळ : निर्माण फर्टिलायझर्स या खत तयार करणाऱ्या कंपनीत काम करणाऱ्या १२ कामगारांना उग्र वासाने अचानक श्वसनाचा त्रास सुरू झाल्याने तातडीने प्राथमिक उपचार देऊन पुढील उपचारासाठी सोलापूर येथील सिव्हील हॉस्पीटल येथे पाठवण्यात आले. ही घटना शुक्रवारी रात्री साडे सात वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबत मोहोळ पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहोळ शहरानजीक तांबोळे रोडवर असलेल्या निर्माण फर्टिलायझर्स ही खत तयार करणारी कंपनी आहे. या कंपनीत कोळेगाव येथील डोंबारी समाजातील महिला व पुरुष काम करतात. दि ७ जानेवारी रोजी दिवसभर कंपनीत कामावर गेले असता त्या ठिकाणी खतामध्ये मिश्र करण्यासाठी आणलेले उग्र वासाचा पदार्थ गाडीतून उतरवून सायंकाळी पाचच्या दरम्यान हे सर्व मजूर आपापल्या घरी गेले. घरी जाऊन बसेपर्यंत सर्वांना उलट्या व श्वसनाचा त्रास सुरू झाला. त्यामुळे या सर्वांना नातेवाइकांनी तातडीने मोहोळ येथील गावडे हॉस्पिटल व ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
अचानक श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने सर्वांना ऑक्सिजन लावण्यात आले. या ठिकाणी डॉ समाधान गावडे, डॉ. नुर खान, डॉ. जिलाणी खान यांनी ऑक्सीजन लावून प्राथमिक उपचारानंतर त्यांना सोलापूर येथील शासकीय रुग्णालयाकडे उपचारासाठी हलवण्यात आले. याठिकाणी शिवसेनेचे नगरसेवक मनोज शेजवाळ यांनी ऍडमिट करण्यास मदत केली, दोन जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.
या घटनेची खबर मिळताच तहसीलदार प्रशांत बेडसे पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल भारती, पोलीस निरीक्षक अशोक सायकर, पोलीस उपनिरीक्षक सुधीर खारगे यांनी गावडे हॉस्पिटलला भेट देऊन रुग्णांची विचारपूस केली.
यामध्ये पूजा सुरेश शिंदे, सविता युवराज शिंदे, रेश्मा सुनिल पवार, कल्पना रमेश शिंदे, उषा सचिन पवार, सुरेखा रवी जाधव, रेखा सुनिल पवार, अंजली विजय पवार, रेश्मा सचिन जाधव , स्वप्ना नितीन पवार या आठ जणांना रुग्णवाहिकेतून ऑक्सिजन लावून सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले.

















