सोलापूर (प्रशांत कटारे) मंगळवार दिनांक 16 नोव्हेंबर हा दिवस अक्कलकोट तालुक्यासाठी अनेक कुटुंबासाठी घातक ठरला. अनेक कुटुंब उध्वस्त झाली, होत्याचं नव्हतं झालं, आपल्या मोबाईलवर बोलण्याच्या नादात सहा जणांचा जीव घेणाऱ्या जीप चालक ‘बागवान’ ने तर सर्वानाच ‘जलील’ केले.
महाराष्ट्रात सध्या एसटी कामगारांनी संपाचे हत्यार उपसले आहे. संप इतका तीव्र झाला आहे की, रस्त्यावर एक सुद्धा एसटी धावताना दिसत नाही त्यामुळे विशेष प्रमुख करून ग्रामीण भागातील प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. यामुळे अवैध प्रवासी वाहतूक जोरात सुरू असल्याचं पाहायला मिळतं. एसटी प्रशासनाने काही स्कूल बस रस्त्यावर उतरून पर्यायी व्यवस्था करून दिली असली तरी ती तोकडी पडत आहे. याच अवैध प्रवासी वाहतुकीने मंगळवारी सहा निष्पाप लोकांचा हकनाक बळी घेतला.
अक्कलकोट स्टॅन्ड वरून “जलील बागवान” हा जीप चालक दहा लोकांच्या बसण्याची व्यवस्था आपल्या गाडीत असताना तब्बल सोळा ते सतरा लोक भरून पैशाच्या हव्यासापोटी सोलापुरकडे निघाला त्याने स्वतःची सीट सुद्धा केवळ 60 रुपयांसाठी दुसऱ्या प्रवाशाला दिली. आणि तो एका कडेवर बसून गाडी चालवू लागला अशात तो मोबाईलवरही बोलत होता, हे वाहन कुंभारी पासून पुढे काही अंतरावर आल्यानंतर रस्त्याचे काम चालू असल्याने एक खड्डा होता, प्रवाशांनी त्याला समोर खड्डा आहे असे सांगितले मात्र फोनवर बोलण्याच्या नादात गाडी खड्ड्यात आदळून रस्त्याच्या मध्ये असलेल्या डिव्हायडरला धडकली आणि वेगात असल्याने ती थेट पलटी झाली मात्र या जलील बागवानने गाडीतून उडी मारली परंतु या गाडीमध्ये बसलेले पंधरा ते सोळा प्रवासी रस्त्यावर आणि रस्त्याच्या बाहेर फेकले गेले काही गाडीमध्ये चेंगरून गेले यामध्ये पाच जणांचा जागेवरच मृत्यू झाला.
जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या तीन रुग्णांची चौकशी केली आणि तातडीने तहसीलदार कडून अहवाल मागवणार असल्याचे सांगितले सर्व प्रवासी हे सामान्य कुटुंबातील असल्याने त्यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. ते मिळेपर्यंत काही खरे नाही.
सोलापूर जिल्ह्यात सध्या रस्त्यांच्या चौपदरीकणाचे काम चालू आहेत काही रस्ते पूर्ण झाले आहेत तर काही रस्ते अपूर्ण आहेत या चौपदरीकरणामुळे अपघाताचे प्रमाण काहीसे घटले आहे.
अक्कलकोट- सोलापूर या मार्गावर अनेक वर्षांपासून काळ्या- पिवळ्या जीप चालतात परंतू काही जीप वयोमान संपले असूनही त्या सक्रिय असल्याचेही समजते असे असताना त्या रस्त्यावर चालतात कशा? आरटीओ आणि वाहतूक शाखेच्या पोलिसांच्या नजरेत का पडत नाहीत? हा मोठा प्रश्न मंगळवारच्या अपघातानंतर उपस्थित होत आहे.
पोटापाण्यासाठी अनेक युवक अशा जीप चालवतात परंतु प्रवाशांचे प्रमाण ठरलेलं असावं, गाडीचे इन्शुरन्स असावे, ही गाडी आउट डेटेड नसावी. प्रमाणाच्या बाहेर प्रवासी भरल्यानंतर अनेक वेळा असे अपघात सोलापूर जिल्ह्यात झालेले आहेत. त्या गाड्यांचे इन्शुरन्स नसते त्यामुळे मयत झालेल्या प्रवाशांना कोणतीही मदत मिळत नाही. निष्पाप गरीब लोक या प्रवासादरम्यान मरण पावतात. मंगळवारची घटना सकाळी अकराच्या सुमारास घडल्यानंतर त्या रस्त्यावर अनेक जीपा चालतात मात्र नंतर सर्व जीपा बंद होत्या अनेकांच्या तोंडून एकच शब्द बाहेर आला क्या रे बागवान, तुने तो हम सबको ‘जलील’ कर दिया.

















