सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघाची निवडणूक अखेर लागली. 17 जागांपैकी ओबीसी प्रवर्गाची एक जागा बिनविरोध झाली. आता 16 जागेसाठी 26 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत सत्ताधारी पॅनलच्या विरोधात दूध संघ बचाव कृती समिती स्थापन करण्यात आली असून त्यांनी आपले उमेदवार उभे केले आहेत. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष बळीराम काका साठे यांनी आपल्या सुनबाई वैशाली जितेंद्र साठे यांना यंदा दूध संघावर संचालक करण्याचा प्रयत्न केला मात्र ते अपयशी ठरले. अर्ज माघारच्या दिवशी त्यांचा माघारी अर्ज उशिरा पोहोचल्याने तो निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी स्वीकारला नाही. त्यांना स्वतंत्र निवडणूक लढवता आली असती मात्र त्या सत्ताधारी पॅनलच्या विरोधात असलेल्या दूध संघ बचाव कृती समिती मध्ये जाऊन मिळाल्या. काका साठे हे आपल्या सुनेच्या प्रचारार्थ मैदानात उतरले असल्याची माहिती समोर येत आहे.
सोलापूर जिल्हा दूध संघाची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी जिल्ह्याचे नेते दिलीप सोपल, आमदार बबनराव शिंदे, आमदार संजयमामा शिंदे, आमदार प्रशांत परिचारक, माजी आमदार राजन पाटील, माजी आमदार दिलीप माने, माजी आमदार दीपक साळुंखे, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, काँग्रेसचे सुरेश हसापुरे, रश्मी बागल, चंद्रकांत देशमुख या नेत्यांनी प्रयत्न केला मात्र त्याला अपयश आले. या सर्व नेत्यांच्या बैठकी दिलीप माने यांच्या फार्महाऊसवर त्यानंतर राजन पाटील यांच्या अनगर गावी तसेच संजयमामा शिंदे यांच्या निमगाव इथल्या फार्महाऊसवर आणि शासकीय विश्रामगृहात झाली. या कोणत्याही बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष काका साठे यांना बोलावण्यात आले नव्हते. राजन पाटील यांच्या कोट्यातून वैशाली साठे यांना संचालक पद मिळेल अशी आशा काका बाळगून होते पण त्या आशेवर पाणी फेरले गेले. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी साठे यांनी वाट पाहिली मात्र कोणताही निरोप आला नाही. शेवटी नाईलाजाने त्यांना सत्ताधाऱ्यांच्या विरोधातील दूध संघ बचाव पॅनल कडे जावे लागले. मोहिते पाटील गट वगळता सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन केलेली आघाडी असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष काका साठे यांनी विरोधात जाऊन निवडणूक लढवण्याचा घेतलेल्या निर्णयावर आश्चर्य व्यक्त केले जात आहे.















