सोलापूर : महाराष्ट्रात युवक काँग्रेसच्या अंतर्गत निवडणुका झाल्या. पक्षांतर्गत युवकांचे हे एकप्रकारचे युद्धच होते. पूर्वी नेत्यांच्या नेमणुकीवर निवडी केल्या जायच्या मात्र आता लोकशाही रुजवण्यासाठी नेते राहुल गांधी यांनी युवा कार्यकर्त्यांमधून मतदान घेऊन या निवडी करण्याचे ठरवले. युवक प्रदेशाध्यक्ष पदासाठी जोरदार रस्सीखेच व चुरस दिसून आली. त्यापेक्षा सर्वात जास्त चुरस होती ती सोलापूर शहर अध्यक्षपदासाठी.
NSUI अध्यक्ष गणेश डोंगरे याच्यासह विद्यमान युवक अध्यक्ष बाबा करगुळे यांच्या कोट्यातून अर्जुन साळवे, जिशान सय्यद या तिघांमध्ये टफ फाईट होती, 12 नोव्हेंबर ते 20 डिसेंबर मतदान होते दरम्यान आमदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर पातळीवर युवक कार्यकर्त्यांमध्ये वाद होऊ नये म्हणून समन्वयाने पदे जाहीर करत यापुढे त्यांनी सांगितलेल्या कार्यकर्त्याला मतदान करण्याच्या सूचना केल्या.
आमदार प्रणिती शिंदे यांचा शब्द अंतिम मानत कार्यकर्ते कामाला लागले . मात्र आमदार प्रणिती शिंदेंनी घेतलेल्या निर्णयाला माजी जिल्हा प्रवक्ते बसवराज बगले यांनी थेट आव्हान दिले, याप्रकरणी बगले यांच्यावर काँग्रेस सोडण्याची नामुष्की आली.
सोलापूर शहर युवक अध्यक्षपदासाठी गणेश डोंगरे यांना फायनल करण्यात आले, जिल्हाध्यक्षपदासाठी पंढरपूरचे सुनंजय पवार यांना मतदान करण्याच्या सूचना झाल्या. आमदार ताईच्या शहर मध्य मतदार संघासाठी वाहिद विजापुरे यांना फायनल झाले. श्रीकांत वाडेकर याला महापालिकेची तयारी करण्याच्या सूचना देण्यात आल्या. शहर उत्तर साठी महेश लोंढे आणि शरद गुमटे यांच्यात स्पर्धा होती मात्र शरद गोमटे याला एनएसयुआय संघटनेत संधी देण्याचे आश्वासन मिळाल्याने महेश लोंढे यांचा मार्ग मोकळा झाला.
दक्षिण विधानसभा मतदारसंघ अध्यक्षपद व प्रदेश सरचिटणीस पदावर प्रणिती शिंदे यांनी कोणताही निर्णय घेतला नाही तो गुलदस्त्यात ठेवलाय. प्रदेशाध्यक्ष पदासाठी कुणाल राऊत व शरण पाटील यांना सपोर्ट करण्याच्या सूचना केल्या होत्या.प्रदेश सरचिटणीस पदासाठी मनोज कुलकर्णी, सुमित भोसले ,प्रवीण जाधव, ओंकार गायकवाड ही युवा मंडळी उमेदवार आहेत.
मतदान झाले, 20 डिसेंबर गेला आता 20 जानेवारी सुद्धा गेली,मात्र अजूनही या निवडणुकीचा निकाल लागत नाही. निवडणुकीसाठी जी वेबसाईट तयार केली होती तीच हँग झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे कुणाला किती मते पडली हे सुद्धा समजले नाही. त्यामुळेच निकाल लागण्यास उशीर होतोय अशी माहिती मिळत आहे. पदासाठी बाशिंग बांधून बसलेले युवक आता ज्येष्ठ होण्याची वेळ आली परंतु अद्यापही निकाल जाहीर केला जात नाही अशी मजेदार चर्चा काँग्रेस मध्ये सुरू झाली आहे.


















