सोलापूर : अन्न व औषध प्रशासन विभाग व पोलिस विभाग यांच्या संयुक्त धडक कारवाईमध्ये गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखु या अन्न पदार्थाचा जप्त करण्यात आलेला सुमारे 01 कोटी, 31 लाख, 01 हजार रुपयाचा साठा नष्ट करण्यात आला आहे.
मार्च 2022 ते जुन 2022 या तीन महिन्याच्या कालावधीमध्ये सोलापूर शहर व जिल्ह्यात 17 ठिकाणी टाकलेल्या धाडीतील प्रतिबंधित अन्न पदार्थाचे एकूण एकत्रित किंमत रुपये 1 कोटी 31 लाख 01,846 चा गुटखा, तंबाखू व पानमसाला साठा दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी इथल्या मे. किर्ती ॲग्रोटेक या कपंनीच्या आवारातील मोकळ्या जागेत जाळून नष्ट करण्यात आलेला आहे.
गुटख्याचा साठा नष्ट करताना सोलापूर तालुका पोलिस स्टेशनचे परि. सहाय्यक पोलिस अधिक्षक सत्यसाई कार्तिक, सहाय्यक आयुक्त (अन्न) प्रदिपकुमार राऊत व सर्व अन्न सुरक्षा अधिकारी प्रज्ञा सुरसे, रेणुका पाटील, उमेश भुसे, प्रशांत कुचेकर व नंदिनी हिरेमठ हे उपस्थित होते.

















