सोलापूर : महानगरपालिकेचे उपमहापौर पद हे अपशकुनी पद…जे सोलापूर महापालिकेत उपमहापौर होतात ते पुढील टर्मला निवडून येत नाहीत हे इतिहास आहे. यामध्ये प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीप कोल्हे, रिपाइं नेते प्रमोद गायकवाड, हारून सय्यद, प्रवीण डोंगरे, सुषमाताई घाडगे, इस्माईल बागवान, फातिमा शेख, अरविंद काकडे, माणिकसिंग मैनावाले, महानंदा भोसले, सुमनताई मुदलियार, अप्पाशा म्हेत्रे, पद्माकर काळे, राजेंद्र कलंत्री, विष्णू निकंबे यांची नावे घेता येतील.
यांना दुसऱ्या टर्मला निवडून येता आले नाही ते पराभूत झाले. पराभवानंतर दिलीप कोल्हे हे पुन्हा महापालिकेत आले. प्रथम सोलापूर महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीचे एक हाती सत्ता आली. सुरुवातीला अडीच वर्ष शशिकला बत्तुल या उपमहापौर झाल्या. त्यानंतर प्रथमच पारधी समाजातील राजेश काळे यांना कॅबिनेट पदाची संधी मिळाली आणि ते उपमहापौर झाले.
मात्र उपमहापौर राजेश काळे यांची कारकीर्द अतिशय वादग्रस्त राहिली आहे. ते सध्या तडीपार असून पुण्यामध्ये वास्तव्यास आहेत. महापालिकेचे उपायुक्त धनराज पांडे यांना केलेली अर्वाच्च भाषेत शिवीगाळ त्यानंतर पक्षाच्या विरोधात घेतलेली भूमिका यामुळे राजेश काळे हे पक्षासाठी अवघड जागेचं दुखणं झालं होतं. शेवटी त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आले. त्यानंतर त्यांच्यावर पोलिसांनी तडीपारीची कारवाई केली.
सध्या राष्ट्रवादीची ताकद शहरांमध्ये वाढत असून काँग्रेस, शिवसेना तसेच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी सुद्धा पक्ष सोडून एनसीपी मध्ये जात आहेत. याच पार्श्वभूमीवर राजेश काळे यांच्याशी संपर्क साधून चर्चा केली असता आपण पक्ष सोडणार नाही. राज्याचे माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांचे आपणावर उपकार आहेत. बापूंच्या प्रतिमेला तडा जाऊ देणार नाही. जरी पक्षाने निलंबित केले, उमेदवारी नाही दिली तरी आपली महापालिकेत निवडणुकीत लढण्याची तयारी आहे.
या भूमिकेवर सोलापूरचं उपमहापौर पद हे अपशकुनी असल्याची उदाहरणे दिली असता भले पक्षाने तिकीट नाही दिले तरी आपण अपक्ष लढण्याची तयारी ठेवली असून यंदा उपमहापौरपदाचा ‘अपशकुन’ हे पुसून काढू एवढी तयारी आपण मागील पाच वर्षात केलेली आहे. पक्षाने जाणीवपूर्वक आपल्यावर कारवाई केली, मी काय मोठा गुंड आहे का? कोणाचा खून केलाय की कोणाला लुटले आहे, कुणाला पैसे मागितले? मटका चालवतो की माझा जुगार अड्डा आहे. आम्ही ‘काळे’ आहोत ‘पाटील’ नाही ना? आम्ही काय करणार? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत.
















