सोलापूर (प्रशांत कटारे) स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदेची निवडणूक 75% पेक्षा कमी संस्था असल्याचा मुद्दा पुढे करत निवडणूक आयोगाने रद्द केली यामुळे जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती, महापालिका तसेच नगरपालिका नगरसेवकांच्या आशेवर पाणी फेरले गेले. आता सोलापूर जिल्ह्यातून सर्वपक्षीय मतदारांनी निवडणूक व्हावी म्हणून न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याची ठरवले आहे, त्यासाठी बैठका सुरू आहेत, वकील देण्यासाठी नियोजन होत आहे.
याच पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये गुरुवारी जिल्हा परिषदेचे विरोधी पक्ष नेते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे यांच्या कार्यालयात सर्वपक्षीय जिल्हा परिषद सदस्यांची बैठक झाली त्या बैठकीला भारतीय जनता पार्टीचे आनंद तानवडे, मदन दराडे, पक्षनेते अण्णाराव बाराचारे, सचिन पाटील, राष्ट्रवादीचे सदस्य त्रिभुवन धाईंजे, काँग्रेसचे भासकी, शेकापचे एडवोकेट सचिन देशमुख, स्वतः शिवसेनेचे जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांची उपस्थिती होती.
या बैठकीमध्ये भारत निवडणूक आयोगाकडे जिल्हा परिषद सदस्यांच्या वतीने तक्रार दाखल करण्याचे ठरवण्यात आले. त्यासाठी सर्व जिल्हा परिषद सदस्यांच्या सही घेण्यात येत आहेत.
सोलापूर जिल्ह्यामध्ये नव्याने स्थापन झालेल्या पाच नगर पंचायत धरून एकूण एकोणीस स्थानिक स्वराज्य संस्था दाखवण्यात आल्या असून त्यामध्ये आठ नगरपंचायत वगळून 11 संस्था दाखवल्याने त्याची संख्या 75 टक्के पेक्षा कमी होते मात्र मतदारांची संख्या पाहिली तर एकूण 82% होते तरीही निवडणूक आयोगाने संस्थेचा मुद्दा पुढे करत ही निवडणूक रद्द केली आहे
परंतू तीन नगरपंचायतीच्या निवडणुका कोरोना संसर्गामुळे होऊ शकल्या नाहीत नव्याने स्थापन झालेल्या 5 नगर पंचायतीचे आरक्षण आणि सदस्य संख्या अद्याप निश्चित झाली नाही. त्या नगरपालिकेच्या जागेवर जिल्हा परिषद गटाचा सदस्य असल्याने त्याला मतदानाचा अधिकार आहे या मुद्द्यावर भारत निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्याची भूमिका जिल्हा परिषद सदस्यांची आहे.
विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष काका साठे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत भारत निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्याचे ठरले असताना दुसरीकडे मात्र राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष दिपक साळुंखे पाटील हे मात्र निवडणूक आयोगाच्या निर्णयाची बाजू लावून धरत आहेत. एकाच पक्षातील दोन नेत्यांच्या भूमिका वेगवेगळ्या कशा असा प्रश्न झेडपी मध्ये उपस्थित होत आहे.

















