आता ‘मनीष’ही सुभाष बापूंसोबत ; काळजेंनी दिला जाहीर पाठिंबा
महाराष्ट्र राज्यामध्ये महायुतीचे सरकार असून प्रत्येक निवडणूक ही महायुती म्हणूनच लढवण्यात येत आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळ निवडणुकीतही महायुतीचा धर्म म्हणून भारतीय जनता पार्टी पुरस्कृत आमदार सुभाष देशमुख व आमदार विजयकुमार देशमुख यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या श्री सिद्धेश्वर बाजार समिती परिवर्तन पॅनलला शिवसेनेचा जाहीर पाठिंबा देण्यात येत असल्याचं शासन नियुक्त माजी बाजार समिती संचालक तथा शिवसेना जिल्हाप्रमुख मनिष काळजे यांनी सांगितले.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती ही महाराष्ट्रातील दोन नंबरची अग्रगण्य बाजार समिती असून सोलापूर शहर व जिल्ह्यातील शेतकरी,व्यापारी,हमाल, तोलार यांच्या हितासाठी व कल्याणसाठी या निवडणुकीत शिवसेना परिवर्तन पॅनलला जाहीर पाठिंबा देत आहे काही स्वार्थी लोकांनी अघोरी युती करत शेतकरी व्यापारी,हमाल,तोलार यांना देशोधडीला लावण्यासाठी व स्वार्थासाठी काँग्रेस सोबत हात मिळवणी करत पॅनल उभे केले आहे.
या पॅनलला शेतकरी सभासद बंधूनी कडाडून विरोध करावा व आमदार सुभाष देशमुख व आमदार विजयकुमार देशमुख यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या श्री सिद्धेश्वर बाजार समिती परिवर्तन पॅनलच्या सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहनही यावेळी शासन नियुक्त बाजार समिती संचालक तथा शिवसेना जिल्हाप्रमुख मनिष काळजे यांनी केले आहे.