संविधान जागर यात्रेच्या प्रेसमध्ये नेते म्हणाले आम्ही भाजपचे नाही ; पत्रकारांच्या प्रश्नांवर उपस्थित झाले कावरे बावरे !
सोलापूर : विविध आंबेडकरी संघटनांनी एकत्र येऊन राज्यात संविधान जागर समिती महाराष्ट्र यांच्या वतीने संविधान जागर यात्रा दिनांक 9 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर 24 दरम्यान सत्याग्रह भूमी महाड ते चैत्यभूमी अशी आयोजित करण्यात आली आहे. या यात्रेत संविधानाच्या हत्येचा प्रयत्न करणारी काँग्रेस अशाप्रकारे काँग्रेस पक्षाला टार्गेट करण्यात आले आहे. त्यावरून ही यात्रा भाजप समर्थक असल्याची दिसून आली.
दरम्यान या यात्रेतील काही प्रमुख सदस्य आज शनिवारी सोलापुरात असून न्यू बुधवार पेठेतील बॉबी चौक याठिकाणी सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या यात्रेची माहिती देण्यासाठी सोलापूर श्रमिक पत्रकार संघात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी संयोजक मंडळातील भाजप अनुसूचित जाती मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष ऍड वाल्मीक निकाळजे बीड, जय भीम आर्मीचे नितीन मोरे, मुंबईच्या योजना ठोकळे, मुंबईच्या स्नेहा भालेराव, सोलापूरचे राजा माने, अजित गायकवाड, भाजप शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांची उपस्थिती होती.
पत्रकारांनी केंद्र सरकारने मागासवर्गीय आणि आदिवासी समाजाला आजपर्यंत किती निधी दिला?, या बजेट मध्ये कितीची तरतूद केली? सामाजिक न्याय विभागाचा कोट्यवधीचा निधी हा इतर योजनांकडे वळवला जात आहे तुम्ही काय करता मग? संविधान भाजप बदलणार असे भाजपचेच नेते वक्तव्य करतात तर तुमच्या तून विरोध का होत नाही? असे अनेक प्रश्न विचारले तेव्हा उपस्थित नेते कावरे बावरे झाल्याचे पाहायला मिळाले. व्यवस्थित उत्तरे देता आली नाहीत. उपस्थितांमध्ये काहींनी तर आम्ही भाजपचे नाही असे म्हणून पत्रकारांपासून सुटका करून घेण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले. एका नेत्याने तर उलट पत्रकारांना पत्रकार हे विविध पक्षाच्या लेबलवर काम करतात असे सांगून शेवटी चिमटा काढला.