माढ्यातून शेकापची बंडखोरी ; अनिकेत देशमुख यांची माघार, एडवोकेट सचिन देशमुख यांनी भरला अर्ज
सोलापूर : माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये शरद चंद्र पवार राष्ट्रवादी पक्षाला धक्का असून माढ्यातून शेतकरी कामगार पक्षाने बंडखोरी करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
डॉक्टर अनिकेत देशमुख हे बंडखोरी करणार होते परंतु त्यांनी माघार घेतल्याने जिल्हा परिषदेचे माजी सदस्य एडवोकेट सचिन देशमुख यांनी काही कार्यकर्त्यांसह येऊन आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
माध्यमांशी बोलताना देशमुख म्हणाले, माढा लोकसभा मतदारसंघासाठी अनिकेत देशमुख यांचा अर्ज आणि माझा असे दोन अर्ज भरण्याचे ठरले होते परंतु शरद पवार यांनी अनिकेत देशमुख यांना बोलवून घेतल्याने त्यांनी माघार घेतली आहे. पण मी माघार घेणार नाही. या माढा लोकसभा मतदारसंघात ओबीसी आणि भटक्या विमुक्त जाती समाजाची तब्बल 11 लाख मते आहेत. शेतकरी कामगार पक्षाला मानणारी दोन लाख मते असून आम्ही किती दिवस माघार घ्यायची? मोहिते पाटील हे आपल्या राजकीय सवडीनुसार पक्ष बदलत राहतात. यंदा त्यांनी माघार घेऊन आम्हाला पाठिंबा द्यावा अशी भूमिका देशमुख यांनी मांडली,
मी स्वर्गीय नेते गणपतराव देशमुख यांच्या कुटुंबातील त्यांच्या विचारांचा आणि त्यांचा राजकीय वारसदार आहे. त्यामुळे शेकापचे कार्यकर्ते माझ्यासोबत राहतील आणि मी विजयी होईल असा दावा एडवोकेट सचिन देशमुख यांनी केला.