रिस्पेक्टफुल सीईओ कुलदीप जंगम…..! नम्रतेची झलक
सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी बुलढाणा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांची शासनाने नियुक्ती केली. सीईओ मनीषा आव्हाळे यांची पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंटच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर शासनाने बदली केली आहे.
शुक्रवारी सकाळी जंगम यांनी आव्हाळे यांच्याकडून पदभार स्वीकारला. आव्हाळे या कार्यालयात आल्यानंतर त्यांनी नूतन सीईओ जंगम यांचे बुके देऊन स्वागत केले. त्यावेळी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या खुर्चीवर बसण्यासाठी आव्हाळे यांनी जंगम यांना विनंती केली परंतु जंगम यांनी अतिशय आदरपूर्वक आणि नम्रपणे सीनियर चा मान राखत मॅडमना त्याच खुर्चीवर बसण्याची विनंती करत स्वतः बाजूला असलेली खुर्ची हाताने घेऊन त्यावर ते बसले.
यावरून कुलदीप जंगम यांच्या नम्रपणाची जिल्हा परिषदेमध्ये चर्चा आहे. मावळत्या सीईओ आव्हाळे यांच्याकडून बराच वेळ त्यांनी जिल्हा परिषदेच्या कामकाजाची सविस्तर माहिती घेतली. त्यानंतर जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बहुउद्देशीय सभागृहात नवे सीईओ जंगम यांचे स्वागत आणि बदली झालेल्या मनीषा आव्हाळे यांना जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने निरोप दिला. जंगम यांनी यावेळी उपस्थित त्यांना आव्हाळे यांनी सुरू केलेले उपक्रम आणि जिल्हा परिषदेला लावलेली शिस्त ती कायम ठेवणार असल्याचे सांगितले.
कोणताही मुख्य कार्यकारी अधिकारी आपापल्या पद्धतीने कामकाज करतो, आपल्या स्वतःच्या संकल्पना आणि वेगवेगळे उपक्रम राबवतो. मागील सीईओचे उपक्रम अथवा संकल्पना त्यापुढे सुरू ठेवल्या जात नाहीत असा जिल्हा परिषदेचा इतिहास आहे. त्यामुळे जंगम यांचे कामकाज कशा पद्धतीने चालेल याकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे.