राम सातपुतेंचे जुळले ‘शहर मध्य’शी ऋणानुबंध ; देवेंद्र कोठे शहर उत्तर? मेळाव्यातून दिसला सूर
सोलापूर : आमदार राम सातपुते यांनी आगामी विधानसभा निवडणूक ही शहर मध्य या मतदारसंघातून लढवावी अशी एकमुखी मागणी भाजप कार्यकर्त्यांमधून पुढे आली. देवेंद्र कोठे यांच्याही तोंडून राम सातपुते हे शहर मध्य मध्ये आले तर मी शेजारच्या मतदारसंघातून लढवेन असे सांगत नकळत ते शहर उत्तर मधून इच्छुक असल्याचे समोर आले आहे.
सोलापूर लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर आमदार राम सातपुते यांनी शहर मध्य या मतदारसंघात असलेल्या सात रस्ता भागात ऋणानुबंध संवाद मेळावा घेतला.
या मेळाव्यात देवेंद्र कोठे, सुधीर बहिरवाडे, शिवसेनेचे गुंड, माजी नगरसेवक राजकुमार हांचाटे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी बोलताना सातपुते यांनी पुढील निवडणूक ही शहर मध्य मधून लढावी, लोकसभा निवडणुकीत मध्य मध्ये मिळालेली मते निर्णायक आहेत, आम्हाला हिंदुत्ववादी आमदार हवा आहे त्यासाठी तुम्हीच शहरात हवे अशी मागणी करण्यात आली आहे.
देवेंद्र कोठे यांनी आपल्या भाषणात देवेंद्र फडणवीस यांच्यावर प्रचंड विश्वास असल्याचे सांगताना त्यांनी माझे पालकत्व स्वीकारले आहे, मी शहर मध्य मध्ये काम केले आता करीत आहे, लोक मला विचारतात, तुम्ही मध्य मध्ये इच्छुक आहेत का? पण फडणवीस हे सांगतील त्याठिकाणी मी लढायला तयार आहे, उद्या फडणवीस यांनी राम सातपुते यांना शहर मध्य मधून उमेदवारी दिली तर मी शेजारच्या मतदारसंघातून निवडणूक लढवेन.
एकूणच कोठे यांच्या भाषणातून ते विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असल्याचे स्पष्ट झाले आहे. शहर मध्य त्यांची पहिली पसंती असली तरी पक्षाने सांगितले तर आपण शेजारच्या (उत्तर मधून)ही मतदारसंघातून लढण्याची तयारी त्यांची दिसत आहे.