सोलापुरात भाजपसाठी धावून येणार खुद्द ‘राम’; जय श्रीरामाचा नारा जोरात घुमणार
सोलापूर : ‘अबकी बार चारसो पार’ ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे घोषणा सत्यात उतरवण्यासाठी भारतीय जनता पार्टी काहीही करण्यास तयार आहे. नुकतेच भाजपची दुसरी यादी जाहीर झाली त्यामध्ये विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी देऊन भाजपने स्थानिक इच्छुकांची तोंड बंद केली. विरोधात बोलण्यास कुणालाही पर्याय उरला नाही त्यामुळे आता सोलापुरात काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांच्या विरोधात ही तसाच तगडा, त्या लेव्हलचा, आक्रमक बोलणारा उमेदवार सोलापूर लोकसभेला मिळणार असल्याची खात्रीशीर माहिती आहे. तो उमेदवार म्हणजे माळशिरसचे आमदार राम सातपुते यांचे नाव ऐकण्यास मिळते.
2014 च्या लोकसभा निवडणुकीत मूळचे सोलापूर जिल्ह्यातील रहिवासी असलेले मात्र व्यवसायात मुंबईमध्ये राहणारे एडवोकेट शरद बनसोडे यांना दीड लाखाच्या मताधिक्याने सोलापूरकरांनी निवडून दिले. बनसोडे आपल्या कामापेक्षा आपल्या इतर सवयींमुळेच चर्चेत राहिले. त्यामुळे भाजपची बदनामी झाली. त्यानंतर 2019 च्या लोकसभा निवडणुकीत तयार झालेले वातावरण पाहता भाजपने भगवेदारी डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांना उमेदवारी देऊन एक लाख 58 हजाराच्या मताधिक्याने विजयी केले. परंतु या पाच वर्षात महाराजांना अपेक्षित काम करता आले नाही. विकासाचा मोठा प्रकल्प त्यांना आणता आला नाही ते बोलण्यात कमी पडले तसेच त्यांच्या बनावट जातीच्या दाखल्यामुळे भाजपची प्रचंड बदनामी झाली.
त्यामुळेच यंदा भाजपने स्थानिक आणि अनुसूचित जातीचा ओरिजनल उमेदवार द्यावा अशा मागणीने जोर धरला. त्यामुळे सोलापूर शहरातील भारतीय जनता पार्टीचे अनेक अनुसूचित जातीचा कार्यकर्त्यांनी पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली आहे परंतु काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे या स्वतः मैदानात उतरल्याने त्यांच्या तोडीस तोड उमेदवार या इच्छुक कार्यकर्त्यांमधून दिसत नाही.
आमदार प्रणिती शिंदे या सोलापूर शहर मध्य या मतदारसंघात मागील तीन टर्म आमदार आहेत. त्यांच्या कामाची पद्धत वेगळी आहे. त्या थेट मतदारांच्या संपर्कात असतात. मतदारांचे प्रत्येक प्रश्न ते विधानसभेत मांडतात. महिला आणि युवकांमध्ये त्यांची प्रचंड क्रेझ आहे. महिला म्हणून ही त्या आक्रमक आहेत. अशावेळी भाजपकडून प्रणिती शिंदे यांना आव्हान देणारा त्याच ताकतीचा उमेदवार भाजपला द्यावा लागणार आहे.
माळशिरसचे आमदार राम सातपुते हे सुद्धा आक्रमक वक्तृत्व शैलीचे नेते आहेत. विधानसभेत प्रत्येक प्रश्न ते तळमळीने मांडतात. ते माळशिरसचे आमदार असतानाही त्यांनी सोलापूर शहरातील सिव्हिल हॉस्पिटल चा प्रश्न विधानसभा आणि जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मांडला होता. मतदार संघात गावोगावी फिरून नागरिकांचे प्रश्न जाणून ते सोडवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. जरी ते इतर जिल्ह्यातले असले तरी मागील पाच वर्षात त्यांनी सोलापूर जिल्ह्यात आपली चांगले ओळख निर्माण केली आहे. विशेष म्हणजे त्यांच्या नावात ‘ राम’ असल्याने भाजपला हा मोठा प्लस पॉईंट म्हणावा लागेल. भाजपकडून त्यांना उमेदवारी मिळाल्यास निश्चितच आमदार प्रणिती शिंदे आणि आमदार राम सातपुते यांच्यातील लढत तितक्याच ताकतीची पाहायला मिळेल.