प्रणिती शिंदे यांचा दिलीप मानेंसाठी नकळत ग्रीन सिग्नल ; सुशीलकुमार शिंदे यांची मात्र सावध भूमिका
सोलापूर : लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेले माजी आमदार दिलीप माने यांचा वाढदिवस शनिवारी अतिशय भव्य दिव्य स्वरूपात साजरा करण्यात आला. या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांच्या वतीने नागरी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या समारंभाला सर्वपक्षीय नेत्यांना निमंत्रित करण्यात आले होते. हा वाढदिवसाच्या विधानसभेसाठी शक्ती प्रदर्शन ठरले. त्यांनी या कार्यक्रमातूनच दक्षिण विधानसभेच्या प्रचाराचा नारळ फोडण्याचे सुद्धा पाहायला मिळाले.
दिलीप माने यांच्यासह डझनभर कार्यकर्ते दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून इच्छुक आहेत त्यामुळे या कार्यक्रमात सुशीलकुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे काय बोलणार याकडे उपस्थित हजारो कार्यकर्त्यांच्या नजरा लागल्या होत्या.
प्रणिती शिंदे यांनी आपल्या भाषणात दिलीप माने यांच्या कार्याचे भरभरून कौतुक केले. परंतु 2019 मध्ये त्यांनी पक्ष सोडल्याने त्याबद्दल नाराजी ही त्यांनी बोलून दाखवली. पण प्रणिती शिंदे यांच्या खासदारकीच्या विजयात दिलीप माने यांचाही वाटा असल्याने त्यांचे काँग्रेसमध्ये स्वागत करताना तुम्ही या परिवारात आले असताना येणाऱ्या ऑक्टोबर मध्ये निश्चितच यश तुमचं आहे, त्यासाठी लाडक्या बहिणी कडून तुम्हाला शुभेच्छा अशा शब्दात त्यांनी नकळत दिलीप माने यांना दक्षिणसाठी ग्रीन सिग्नल दिल्याचे दिसून आले.
सुशीलकुमार शिंदे म्हणाले, दिलीपरावांना भविष्यात कुठे ही संधी असेल त्यावेळेस आम्ही त्यांच्या सोबत राहू,हे राजकीय क्षेत्र आहे त्यामध्ये माणूस सातत्याने पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतो, मी जाहीरपणे आश्वासन दिले तर इतर कार्यकर्ते नाराज होतील, म्हणून प्रणितीने सांगितले आपण सर्व एकत्रित राहू या, त्यातून काँग्रेसची संघटना मजबूत करू, जो काय हायकमांड निर्णय घेईल त्याचा पाठीशी उभा राहून प्रयत्न करू अशाच प्रकारची भूमिका आपण घेतली पाहिजे, निवडणुकीमध्ये उमेदवारी मागणारे अनेक असतात, एकाच मतदारसंघात 17 जण इच्छुक आहेत, परंतु हाय कमांड त्यातून ठरवत असते त्यामुळे योग्य वेळ आल्यावर योग्य निर्णय होईल.
दिलीप माने यांनी आपल्या 62 वर्षाच्या प्रवासाचे अनुभव सांगितले, शाळेत मॉनिटर, कॉलेज मध्ये सीआर हे सर्व निवडणुकीतून झालो नंतर जी एस, पंचायत समिती सभापती, जिल्हा मध्यवर्ती बँक, खरेदी विक्री संघ, बाजार समिती अशा अनेक संस्थावर काम केले. जेवढे काय माजी असेल ते मलाच एकट्याला लागू आहे. आजी म्हटले तर फक्त तुम्ही जनता लोक आहात. मी जिथे राहतो तिथे प्रामाणिक असतो, आजही मी शिंदे कुटुंबाशी प्रामाणिक आहे. त्यामुळे जनतेची सेवा करण्याचा मला आशीर्वाद द्या असे आवाहन केले.