प्रणिती शिंदे यांनी घेतला आई -वडिलांच्या पराभवाचा बदला ; लाखाच्या फरकाने विजय
सोलापूर राखीव मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. या मतदारसंघातून काँग्रेसच्या युवा आमदार प्रणिती शिंदे यांनी आमदार भाजपचे आमदार राम सातपुते यांचा 75 हजाराच्या फरकाने पराभव केला आहे. या विजयाने काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांनी आपल्या आई-वडिलांच्या पराभवाचा एक प्रकारे पराभवाचा बदलाच घेतला असेच म्हणावे लागेल.
2004 च्या लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या उज्वला शिंदे यांचा सुभाष देशमुख यांनी पराभव केला होता. त्यानंतर 2014 आणि 2019 च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुशीलकुमार शिंदे यांचा सलग दोन वेळा पराभव झाला. त्यामुळे या 2024 च्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. काँग्रेसकडून कोण उमेदवार असणार याचीही उत्सुकता होती. मात्र प्रणिती शिंदे यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकी वेळेस 2024 ची लोकसभा लढविणार असा निर्धार पत्रकारांशी बोलून दाखविला होता.
त्यानुसार 2024 च्या निवडणुकीत त्यांना उमेदवारी मिळाली. त्यांनी मागील सहा महिन्यापासूनच सोलापूर मतदारसंघ पिंजून काढला होता. या मतदारसंघातील सर्वच्या सर्व गावांमध्ये त्यांनी भेटी दिल्या आणि आपला प्रचार केला. एकूणच देशातील वातावरण पाहता आणि या मतदारसंघातील तब्बल पाच आमदार हे महायुतीचे असल्याने काँग्रेसला ही निवडणूक सोपी नव्हती. सोलापूर जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलली होती.
प्रचारांमध्ये सुरुवातीला वैयक्तिक पातळीवर टीका झाली, त्यानंतर विकासाच्या मुद्द्यावर आणि शेवटी जातीय मुद्द्यावर प्रचार झाला.
भाजप कडून राम सातपुते हे उमेदवार आल्याने आणि अयोध्येच्या राम मंदिराचा मुद्दयावर त्यांचा विजय होईल अशी शक्यता सर्वत्र वर्तवले जात होती. परंतु भाजपने तिसऱ्या वेळी उमेदवार बदलला यापूर्वीच्या दोन्ही खासदारांनी सोलापूरकरांचा भ्रमनिराश केला, तसेच राम सातपुते यांच्यावर परका उमेदवार टीका झाली प्रणिती शिंदे यांनी ‘सोलापूरची लेक’ म्हणून सोलापूरकरांना भावनिक साद घातली, भाजपने शेवटच्या टप्प्यात हिंदू मुस्लिम असा जातीय रंग देण्याचा प्रयत्न केला परंतु सोलापूरकरांनी ते मान्य केले नाही, मराठा समाज, मुस्लिम समाज, आंबेडकरी समाज, लिंगायत समाज यांची मते निर्णायक ठरली.
सोलापूर लोकसभेच्या मतदारसंघात मोहोळ, मंगळवेढा- पंढरपूर, शहर उत्तर, शहर मध्य, सोलापूर दक्षिण व अक्कलकोट असे सहा मतदारसंघ येतात. यापैकी मोहोळ आणि पंढरपूरने तब्बल एक लाखाचे मताधिक्य प्रणिती शिंदे यांना दिले आहे या जोरावरच त्यांचा विजय झाला. अक्कलकोट तालुका 10 हजार आणि शहर उत्तरने 35 हजार मताधिक्य राम सातपुते यांना दिले.