प्रमोद मोरे उचलणार ‘शहर मध्य’चे शिवधनुष्य ; अनेक दिग्गजांना मागे टाकणारे प्रमोद मोरे आहेत तरी कोण?
सोलापूर : विधानसभा निवडणुकीसाठी सोलापुरातील शहर मध्य हा मतदारसंघ महायुती मधून एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेला जाणार असल्याने अनेक जण इच्छुक आहेत पण मागील काही दिवसात एकच चेहरा सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे ज्याने अनेक इच्छुकांना मागे टाकले तो म्हणजे प्रमोद मोरे यांचा.
शहर मध्य या बहुभाषिक मतदारसंघात जो चेहरा सर्व समाजाची मते घेतो तो विजयी होतो असा आजपर्यंतचा इतिहास आहे. मागील तीन टर्म कॉंग्रेसच्या प्रणिती शिंदे यांनी या मतदारसंघातून विजय संपादन केला. आता त्या खासदार झाल्या आहेत, त्यामुळे अनेकांनी या मतदारसंघात आमदारकीसाठी देव पाण्यात ठेवले आहेत.
महायुती मधून ही जागा निश्चित एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला जाणार हे जवळजवळ फिक्स आहे. शिवसेनेकडून जिल्हा संपर्कप्रमुख प्राध्यापक शिवाजीराव सावंत, जिल्हाप्रमुख मनीष काळजे, राज्य प्रवक्त्या प्राध्यापिका ज्योती वाघमारे यांची नावे चर्चेत आहेत परंतु मागील 15 ते 20 दिवसांपासून प्रमोद मोरे हे नाव इच्छुकांमध्ये आघाडीवर आहे. त्यांच्याच नावाची सर्वत्र चर्चा ऐकण्यास मिळत आहे त्यांची उमेदवारी सुद्धा निश्चित झाल्याचे बोलले जात असून अनेक इच्छुक हे उमेदवारीसाठी मुंबईमध्ये तळ ठोकून असल्याचे माहिती आहे.
या निवडणुकीत बाहेरचा उमेदवार कितपत चालणार हा सुद्धा पक्षासमोर प्रश्न आहे. त्याचबरोबर पक्षाचे राज्य सचिव माशीलकर यांनी या निवडणुकीत शिवसेना स्वच्छ प्रतिमा, गुन्हे दाखल नसलेला उमेदवार देणार अशी भाषा केल्याने इच्छुकांमध्ये आघाडीवर असलेल्यांची ‘मनीषा ‘ धुळीस मिळण्याची शक्यता आहे.
कोण आहेत प्रमोद मोरे?
मूळ गाव अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर, सध्या जुळे सोलापुरातील मिरा नगरात राहतात. शिक्षण बीई सिव्हील, घरातच राजकीय वारसा असल्याने वडील स्वर्गीय ब्रह्मानंद मोरे यांच्याकडून राजकारणाचे धडे, त्यामुळे विद्यार्थी चळवळीमध्ये सक्रिय सहभाग. त्यानंतर अक्कलकोट तालुक्यातील ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद या निवडणुकांमध्ये उमेदवारांना निवडून आणण्यात महत्त्वाचा वाटा. स्वतः सिव्हिल इंजिनियर असल्याने दत्त कंट्रक्शनच्या माध्यमातून हजारो हातांना रोजगार दिला आहे. स्वर्गीय ब्रह्मानंद मोरे प्रतिष्ठानच्या माध्यमातून सामाजिक कार्यकर्त्यांना त्यांनी सर्वांचे लक्ष वेधले. आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, शेतकऱ्यांसाठी शिबिरे भरवताना विशेष करून युवक, महिला, शेतकरी, गोरगरीब जनतेसाठी सामाजिक उपक्रम राबवले आहेत. कोरोना काळात मोरे प्रतिष्ठानने केलेले काम कौतुकास्पद होते. आपल्या कार्यातून महिला सक्षमीकरणातून हजारो महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे.