दिलीप मानेंचा वाढदिनी सत्कार की, विधानसभेचे शक्ती प्रदर्शन ; माने यांनी जपले राजकीय ऋणानुबंध
सोलापूर : माजी आमदार दिलीप माने यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य नागरी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाची जोरदार चर्चा असून हा वाढदिवसाचा सत्कार होता की, आगामी विधानसभा निवडणुकीचे शक्ती प्रदर्शन असा भव्य दिव्य कार्यक्रम झाला. माने यांनी आपले राजकीय ऋणानुबंध जपल्याचे पाहायला मिळाले.
दिलीप माने हे सध्या काँग्रेसमध्ये आहेत. लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान त्यांनी काँग्रेस पक्षात पुन्हा प्रवेश केला होता. आता पुन्हा एकदा त्यांनी दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून मोर्चे बांधणी सुरू केल्याचे चित्र आहे. या वाढदिवस सत्काराचे नियोजन पाहिले असता संपूर्ण दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात मार्केटिंग केल्याचे पाहायला मिळाले.
वाढदिवस गौरव समितीने याच मतदारसंघात असलेल्या जामगुंडी मंगल कार्यालयात सत्कार समारंभाचे आयोजन केले होते. बाहेर प्रवेशद्वारात तब्बल दहा जेसीबी उभ्या करण्यात आल्या होत्या, त्यातून सत्कारमूर्ती दिलीप माने आणि प्रमुख पाहुणे काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे आणि खासदार प्रणिती शिंदे यांची या जेसिबितून पुष्प वृष्टी करून भव्य स्वागत करण्यात आले. तब्बल दहा हजार नागरिकांची या कार्यक्रमाला उपस्थिती होती.
माने यांनी आपले राजकीय ऋणानुबंध ही जपल्याचे पाहायला मिळाले. त्यामध्ये माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, खासदार प्रणिती शिंदे, उज्वला शिंदे, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, माजी आमदार राजन पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष काका साठे, सिध्देश्वर कारखान्याचे मार्गदर्शक धर्मराज काडादी, दूध संघाचे संचालक सुरेश हसापुरे, माजी आमदार प्रकाश यलगुलवार, अध्यक्ष चेतन नरोटे, मंगळवेढ्याचे शिवाजीराव काळुंगे, माजी महापौर सुशीला आबुटे, इंदुमती अलगोंडा, मनोहर सपाटे, काँग्रेसचे सुदीप चाकोते, आरीफ शेख, काँग्रेसचे भारत जाधव, माजी उपसभापती संभाजी भडकुंबे, अशोक देवकते, रजनी भडकुंबे, गुरूसिद्ध म्हेत्रे, विनोद भोसले, बाबा करगुळे, गणेश डोंगरे, दादा कोरे, बिपिन पटेल यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.