पोलिसांच्या बंदोबस्तात पालकमंत्र्यांची तालुकानिहाय भाजप कार्यकर्त्यांसोबत बैठका सुरू
सोलापूर : जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे बुधवारी सोलापूर दौऱ्यावर आहेत. संपूर्ण दिवसभर ते सात रस्ता येतील शासकीय विश्रामगृहावर असून पूर्ण दिवस ते राजकीय बैठका घेत असल्याची माहिती समोर आली आहे.
सकाळी साडेदहापासून या बैठकांना सुरुवात झाली आहे. साडे अकराच्या सुमारास शासकीय विश्रामगृहावर सर्व बाजूनी पोलिसांचा बंदोबस्त पाहायला मिळाला. मुख्य प्रवेशद्वारावर पोलीस कर्मचारी हे थांबून होते. प्रत्येकाला अडवून विचारून आत मध्ये पाठवले जात होते. आत मध्ये आल्यावर सुद्धा पुष्कराज या शासकीय विश्रामगृहातील इमारतीला लोखंडी बॅरिगेट ने घेराव घालण्यात आला होता आणि सर्वत्र पोलीस उभे करण्यात आले आहेत.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे आत मध्ये सोलापूर जिल्ह्यातील अकरा तालुक्यातील भारतीय जनता पार्टीच्या काही ठराविक पदाधिकाऱ्यांना बोलावून बैठका घेत असल्याचे समजले. तालुका निहाय प्रत्येकांना वेळ देण्यात आली आहे. त्याप्रमाणे कार्यकर्ते पालकमंत्र्यांच्या बैठकीला आत जात असल्याचे दिसून आले.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठका लावण्यात आल्या असून तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या अडचणी, विकास निधी यासंदर्भात पालकमंत्री हे चर्चा करत आहेत अशी माहिती मिळाली. मुळात जिल्हा नियोजन समितीचा सर्व निधी वितरित झाल्यानंतर आता या बैठकीला काय महत्त्व असाही नाराजीचा सूर भाजपच्या काही कार्यकर्त्यांमधून ऐकण्यास मिळत आहे.