मोहोळ मध्ये मानेच ‘यशवंत’ होणार ! जनताच म्हणते शंभर टक्के ‘खरे ‘
सोलापूर : मागील काही महिन्यांपासून मोहोळ विधानसभा मतदारसंघातील राजकारण एका विषयावरून चांगलेच तापले आहे. तो विषय म्हणजे अनगर येथे मंजूर झालेले अप्पर तहसील कार्यालय. सुरुवातीला या कार्यालयावरून या मतदारसंघाचे आमदार यशवंत माने, माजी आमदार राजन पाटील हे काहीसे बॅक फुटवर गेले होते. मोहोळ मधील सर्वच राजकीय पक्षांनी एकत्रित येऊन अप्पर तहसील कार्यालयाला विरोध केला होता. काही दिवसांनी अजित पवारांची जनसंवाद यात्रा झाली. ती यात्रा यशवंत माने, राजन पाटील तसेच बाळराजे पाटील यांनी यशस्वी करून दाखवली.
उमेश पाटलांनी जनसंवाद यात्रेदरम्यान मोहोळ बंद ठेवले तसेच त्यापूर्वी काही वक्तव्य केल्याने अजित पवार यांच्यासह सुनील तटकरे हे सुद्धा त्यांच्यावर नाराज झाले. अजित पवारांनी भर सभेमध्ये उमेश पाटलांवर सडकून टीका केली त्यामुळे नाराज झालेल्या उमेश पाटलाने अजित पवारांची राष्ट्रवादी सोडण्याचा निर्णय घेतला त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.
यशवंत माने यांच्या विरोधात उमेदवार द्यायचा कुणी यासाठी मोर्चेबांधणी झाली. यापूर्वी दोन-तीन वेळा विधानसभा लढवलेले संजय क्षीरसागर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाकडून तयारी केलेले राजू खरे, माजी आमदार रमेश कदम यांची नावे चर्चेला आली.
यशवंत माने यांना पुन्हा अजित पवारांनी उमेदवारी दिली त्यानंतर शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसने रमेश कदम यांच्या कन्या सिद्धी कदम यांना उमेदवारी जाहीर झाली. त्यामुळे इच्छुकांसह राष्ट्रवादीचे सर्वच नेते नाराज झाले. यामध्ये जिल्हाध्यक्ष बळीराम साठे, उमेश पाटील यांच्यासह काँग्रेस, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर मात्र उमेदवार बदलण्याचा निर्णय झाला आणि राजू खरे यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे मोहोळ मध्ये सुद्धा बंडखोरी झाली आहे.
मोहोळ मध्ये महायुतीची बंडखोरी कमी आहे मात्र महाविकास आघाडीतून बंडखोरी झाल्याचे पाहायला मिळते. या सर्व नेत्यांमध्ये अजूनही मेळ पाहायला मिळत नाही.
एकूणच यशवंत माने यांनी मागील पाच वर्षात मोहोळ विधानसभा मतदारसंघात केलेला विकास, प्रत्येक गावागावात दिलेला निधी, सर्वांशी ठेवलेला संवाद याच्या जोरावरच त्यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांनी राजन पाटील व त्यांच्या कुटुंबाशी ठेवलेले अतिशय जिव्हाळ्याचे संबंध हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहेत.
तसे पाहायला गेले तर यशवंत माने यांचा स्वभाव ही सर्वांना सोबत घेणार आहे. ते कधी कुणाला चिडचिड करताना दिसत नाहीत. कुणाला नाराज ही करताना आजपर्यंत दिसून आलेले नाही. राजन पाटील यांची मतदार संघावरील पकड, पक्षाची बांधणी, आणि ताकद पाहता निश्चितच पुन्हा यशवंत माने हे विधानसभेत दिसतील असा विश्वास कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.