सोलापुरकरांसाठी मोदी सरकारचे ‘‘समर गिफ्ट’’ ; काय आहे ही न्यूज
सोलापूर : देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शाश्वत विकासाचा अजेंडा राबवला आहे. मुंबई, पुणे अशा प्रगतीशील शहरांच्या बरोबरीने आता सोलापुरातसुद्धा ‘वंदे भारत
एक्स्प्रेस’साठी कोचिंग डेपोला केंद्र सरकारने मंजुरी दिली. त्यामुळे शहराची नवी ओळख निर्माण होणार असून, सोलापुरकरांसाठी हे ‘‘समर गिफ्ट’’ आहे, असे मत आमदार राम सातपुते यांनी व्यक्त केले.
सोलापुरात ‘वंदे भारत एक्स्प्रेस’साठी कोचिंग डेपो बांधण्याला रेल्वे बोर्डाने मंजुरी दिली. सुमारे ५० कोटी रुपये खर्चून हा डेपो उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मध्य रेल्वेच्या बांधकाम विभागाकडून हे काम करण्यात येणार आहे.
राम सातपुते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्यात आली. सोलापूर विभागातून सध्या दोन ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ धावत आहेत. यात सोलापूर-मुंबई व कलबुर्गी-बंगळुरू यांचा समावेश आहे. पैकी मुंबईला जाणाऱ्या गाड्यांची देखभाल व दुरुस्ती मुंबईत होत आहे, तर कलबुर्गीहून सुटणाऱ्या ‘वंदे भारत एक्स्प्रेस’चे बंगळुरू येथे देखभाल व दुरुस्ती केली जात आहे. सोलापूरला डेपो झाल्यानंतर येथेच डब्यांची देखभाल व दुरुस्ती होणार आहे. त्यामुळे भविष्यात सोलापुरातून सुटणाऱ्या ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ गाड्यांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. त्याचा फायदा सर्वसामान्य रेल्वे प्रवाशांना होईल.
सोलापूर रेल्वेचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक योगेश पाटील म्हणाले की, कोचिंग डेपोसाठी ६०० मीटर लांबीची नवीन पिटलाइन, डब्यांच्या सुरक्षेसाठी कव्हर्ड शेड बांधण्यात येणार आहे. एक रेकच्या देखभाल व दुरुस्तीसाठी किमान ६ तास लागतील. एक स्वतंत्र इमारत बांधण्यात येणार आहे. सोलापुरात बांधला जाणारा हा मध्य रेल्वेचा तिसरा डेपो असणार आहे. सध्या मुंबई विभागात (वाडी बंदर) असा डेपो असून, दुसरा डेपो पुण्यातल्या घोरपडी भागात बांधण्याचे काम सुरू झाले आहे.
देशात सध्या विविध लोहमार्गांवर ५१ ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ धावत आहेत. येणाऱ्या काळात ही संख्या आणखी वाढणार आहे. कोणत्याही स्थानकावरून ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ सुरू होण्यासाठी ‘कोचिंग मेंटेनन्स डेपो’ असणे ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वातील केंद्र सरकारच्या माध्यमातून सोलापूर आणि परिसराच्या विकासासाठी महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभारण्याचा संकल्प आहे. ज्यामुळे उद्योग-व्यावसाय आणि रोजगार निर्मितीला चालना मिळावी, असा निर्धार आम्ही केला आहे.
-राम सातपुते, आमदार, भाजपा.