सोलापुरातील मोची समाज बंडखोरीच्या तयारीत ; काँग्रेसच्या अंबादास बाबा करगुळे यांनी हा दिला इशारा
सोलापूर : जांबमुनी मोची समाज युवक संघटनेचे माजी अध्यक्ष व जांबमुनी मोची शहर जिल्ह्याचे सरचिटणीस अंबादास बाबा करगुळे यांच्या नेतृत्वाखाली मोची समाज पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक मोची समाजाच्या माजी जिल्हाध्यक्ष प्रा नरसिंह आसादे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. सोनी नगर भागातील हुडको येथील समाजाच्या सभागृहात या बैठकीचे आयोजन झाले.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक बोलावण्यात आली होती. यावेळी समाजाचे कार्याध्यक्ष हणमंतु सायबोळु, मोची समाजाचे उपाध्यक्ष नागनाथ कासोलकर, कुमार जंगडेकर, विभागीय अध्यक्ष सुरेश भंडारे, शिवराम जेगले, अर्जुन साळवे, माजी युवक अध्यक्ष यलप्पा तुपदोळकर, माजी रथोत्सव अध्यक्ष अंबादास नाटेकर, हुसनप्पा वल्लापोलु, रामकृष्ण पल्ले, नागनाथ म्हेत्रे, युवा नेते संजु जंगडेकर, लक्ष्मण आसादे, मल्लु म्हेत्रे यांच्यासह मोची समाजातील सर्व विभागातील युवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बाबा करगुळे यांनी आपल्या भाषणात मोची समाजाने आजपर्यंत काँग्रेस पक्षाच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिल्याचे सांगितले. आमदार प्रणिती शिंदे यांच्या तीन टर्म आमदारकीच्या विजयात मोची समाजाचा सिंहाचा वाटा होता याची आठवण करून दिली. काँग्रेस पक्षाने यंदा मोची समाजाला विधानसभेसाठी संधी द्यावी अन्यथा समाज आपला उमेदवार काहीही करून उभा करेल असा इशारा दिला.
यावेळी प्राध्यापक नरसिंह आसादे, हनुमंतु सायबोळू, नागनाथ कासलोलकर यांनीही समाजाच्या भावना व्यक्त करताना यंदा मोची समाजाचा आमदार झालाच पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली.