आमदार देवेंद्र कोठे यांच्या पाठपुराव्याला यश ; अक्कलकोट रस्ता एमआयडीसीतील विकासकामांचा मार्ग मोकळा
सोलापूर : अनेक दशकांपासून प्रलंबित असलेल्या अक्कलकोट रस्ता एमआयडीसी आणि होटगी रस्ता एमआयडीसीतील विकासकामांचा मार्ग मोकळा झाला आहे. आमदार देवेंद्र कोठे यांच्या उपस्थितीत गुरुवारी मंत्रालयात उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या दालनात उद्योग विभागाच्या सचिवांसमवेत झालेल्या बैठकीत दोन्ही एमआयडीसीतील विकासकामांसाठी विशेष बाब म्हणून प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना उद्योग विभागाचे सचिव डॉ. पी. अनबलगन यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद या बैठकीस दूरदृश्यप्रणालीद्वारे हजर होते.
अक्कलकोट रस्ता एमआयडीसी आणि होटगी रस्ता एमआयडीसी मध्ये मूलभूत सुविधांचा प्रचंड अभाव आहे. अक्कलकोट रस्ता एमआयडीसी १९९२ साली सोलापूर महानगरपालिकेकडे हस्तांतरित झाल्यानंतर एमआयडीसीमधील विकासकामांना निधी देण्यास राज्य शासनाला तांत्रिक अडचणी येत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून येथील उद्योजक आणि कामगारांना तसेच नागरिकांना रस्ते, पथदिवे आणि अन्य सुविधांच्या अभावामुळे त्रासाला सामोरे जावे लागत आहे. याचा थेट परिणाम उद्योगांवर होत आहे. त्यामुळे या दोन्ही एमआयडीसीमध्ये मूलभूत सुविधांची पूर्तता करावी अशी मागणी उद्योजकांकडून वारंवार केली जात आहे. सोलापूर महानगरपालिकेची आर्थिक स्थिती पाहता एमआयडीसीतील मूलभूत सुविधांसाठी शासनाचा निधी मिळणे आवश्यक आहे. यावर उपाय म्हणून शासनाने त्वरित मार्ग काढावा, अशी मागणी आमदार देवेंद्र कोठे यांनी या बैठकीत केली.
एमआयडीसी सोलापूर महानगरपालिकेला हस्तांतरित झाल्यामुळे शासनाचा निधी मिळण्याबाबत अधिकाऱ्यांकडून साशंकता व्यक्त केली जात होती. तांत्रिकदृष्ट्या निधी मिळणे दुरापास्त असल्याचे सांगण्यात आले. हवे तर महानगर पालिकेकडून हा भाग हस्तांतरित करून घ्यावा आणि सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशीही चर्चा झाली. मात्र, दुहेरी कर आकारला जाणे जाचक ठरेल म्हणून हाही प्रस्ताव बाजूला पडला. बैठकीचा नकारात्मक सूर पाहून सोलापूरहून आलेले उद्योजक देखील हताश झाले. आमदार देवेंद्र कोठे यांनी मात्र आग्रहाने भूमिका लावून धरली. याबाबतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन उद्योजकांच्या व्यथा आपण त्यांच्यासमोर मांडल्या असता, त्यांनी पत्रावर उद्योगविभागाच्या प्रधान सचिवांच्या नावाने सकारात्मक शेरा मारून विशेष बाब म्हणून यातून सकारात्मक मार्ग काढण्याच्या सूचना उद्योग सचिवांना दिल्या आहेत. शिवाय उद्योगमंत्री उदय सामंत देखील सकारात्मक असल्याचे आमदार देवेंद्र कोठे यांनी सांगितले. या समस्यांबाबत विविध वर्तमानपत्रातील कात्रणेही आमदार देवेंद्र कोठे यांनी बैठकीत दाखवली. यंत्रमागधारक संघाचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम व चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष राजू राठी यआणि देखील या औद्योगिक वसाहती मधील समस्या अधिकाऱ्यांसमोर मांडल्या. आमदार देवेंद्र कोठे यांनी त्यांच्या पत्रावर मुख्यमंत्री व उद्योग मंत्र्यांनी मारलेले शेरे दाखवल्याने अधिकाऱ्यांनी वरिष्ठ पातळीवरून तशा सूचना आल्यास बघू अशी भूमिका घेतली. आमदार देवेंद्र कोठे यांनी तत्काळ उपस्थित अधिकारी व उद्योजकांना सोबत घेऊन उद्योग सचिव डॉ. पी. अनबलगन यांचे दालन गाठले. त्यांना या विषयाचे गांभीर्य लक्षात आणून दिले. सोलापूर महानगरपालिकेची आर्थिक स्थिती आणि एमआयडीसीतील मूलभूत सुविधांची गरज ओळखून उद्योग सचिवांनी सर्वांसमक्ष उद्योग विभागाच्या उपसचिवांना दूरध्वनीवरुन संपर्क साधला. सगळी माहिती घेऊन तातडीने बैठक घेऊन विशेष बाब म्हणून प्रस्ताव पाठवण्यास सांगितले. सोलापुरातील दोन्ही एमआयडीसीतील मूलभूत सुविधांचा प्रश्न कोणत्याही परिस्थितीत मार्गी लावू, असे आश्वासन देत त्यांनी आमदार देवेंद्र कोठे यांच्या पत्रावर तसा सकारात्मक शेराही मारला.
याप्रसंगी श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र आणि पुष्पगुच्छ देऊन उद्योग विभागाचे सचिव डॉ. पी. अनबलगन यांचा सत्कार आमदार देवेंद्र कोठे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी यंत्रमागधारक संघाचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम, चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष राजू राठी, मल्लिकार्जुन कमटम व सिद्धेश्वर कमटम आदी उपस्थित होते.
—————-
माध्यमांची भूमिका ठरली महत्त्वाची
अक्कलकोट रस्ता एमआयडीसी आणि होटगीरोड एमआयडीसी येथील समस्यांबाबत माध्यमांनी वारंवार बातम्या प्रसिद्ध केल्या होत्या. आमदार देवेंद्र कोठे यांनी विविध कागदपत्रांसह वर्तमानपत्रातील कात्रणेही अधिकाऱ्यांना दाखवत उद्योजक आणि कामगारांच्या व्यथा तळमळीने शासनासमोर मांडल्या. त्यामुळे यात माध्यमांचीही भूमिका महत्त्वाची ठरली.