ब्रेकींग ! भूमी अभिलेख कार्यालयातील शिपायाला सहा हजाराची लाच घेताना पकडले
सोलापूर : सोलार प्लांट साठी शेतजमीन भाडेतत्त्वावर देण्याकरिता अक्कलकोट भूमी अभिलेख कार्यालयात नक्कल मिळण्यासाठी अर्ज केलेल्या शेतकऱ्याकडून सहा हजाराची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने कार्यालयातील शिपायाला रंगेहाथ पकडले आहे.
लोकसेवक महेश भागवत घाडगे वय ३२ वर्षे, पद शिपाई नेम उपअधिक्षक, भुमि अभिलेख कार्यालय, अक्कलकोट ता. अक्कलकोट जि. सोलापूर वर्ग ४, रा. मु.पो. शिवणे ता. सांगोला जि. सोलापूर असे त्या शिपायाचे नाव आहे.
यातील तक्रारदार यांची मौजे करजगी ता. अक्कलकोट जि. सोलापूर येथे गट नं. ५१५ व गट नं. ५१६ येथे एकुण ३४ एकर शेतजमीन असुन सदर शेतजमीन हि सोलार प्लांटसाठी भाडेतत्वावर देण्याचे तक्रारदार यानी ठरविले होते. त्याकामी त्यांनी नमुद शेतजमीनीचा गाव नकाशा, स्कीम उतारा, गट नकाशे, टिपण, फाळणी व आकार बंद नक्कल इत्यादी कागदपत्रे मिळणेसाठी उपअधिक्षक, भुमि अभिलेख कार्यालय, अक्कलकोट येथे जावुन विनंती अर्ज सादर केला होता. वरील नमुद आलोसे यांनी सदरचा विनंती अर्ज स्वतःकडे ठेवुन घेवुन रु. ६००० लाचेची मागणी करुन, लाच रक्कम दिल्यानंतरच सदर अर्जावर पुढील कार्यवाही करण्यात येईल असे तक्रारदार यांना सांगीतले. प्रस्तुत प्रकरणी आज रोजी करण्यात आलेल्या पडताळणी कारवाईमध्ये आलोसे यांनी रु. ६००० लाचेची मागणी करुन लाचेची रक्कम रु. ६००० कार्यालयामध्ये स्वतः स्वीकारली आहे. यावरुन वर नमुद लोकसेवक यांचे विरुध्द अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे, सोलापूर ग्रामीण येथे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे.