सोलापूर : प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत भाजपच्या पदाधिकाऱ्याने वादग्रस्त वक्तव्य केले, त्याचे संपूर्ण देशात पडसाद उमटले. सोलापूर शहरात एमआयएम पक्षाचे शहर अध्यक्ष फारूक शाब्दी यांनी मुस्लिम समाजाला एकत्र येण्याचे आवाहन केले, हा मोर्चा पक्ष विरहित असेल असेही त्यांनी आवर्जून सांगितले होते त्यामुळे सर्व पक्षातील मुस्लिम नेत्यांनी एकत्र येऊन या मोर्चात सहभाग नोंदवला.
सोलापूर शहरात अनेक वर्ष पाहिला नसेल असा विराट मोर्चा यावेळी सोलापूरकरांनी अनुभवला. मोर्चाचे नेतृत्व करणाऱ्या फारुक शाब्दी यांची चांगली चर्चा झाली. या मोर्चामुळे एमआयएमच्या प्रत्येक कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आणि जोश निर्माण झाला होता. त्यातही शाब्दी स्वतःची प्रसिद्धी करायला विसरले नाहीत. गाडीवर उभे राहून फोटोसेशन करून घेतले.
सोलापूर शहरातील मुस्लिम समाजामध्ये अजूनही एमआयएम पक्षाची क्रेझ कायम आहे मात्र त्याचा फायदा पक्षाला करून घेण्यात शाब्दी हे अपयशी ठरत असल्याचे चित्र आहे. होम मैदान लगत मध्यवर्ती भागात त्यांनी आपले कार्यालय सुरू केले होते मात्र दोन महिन्यांपासून या कार्यालयात एकही माणूस दिसत नाही. कार्यालय कायम बंद असते असेच कार्यालय शाब्दी यांनी आपल्या बंधूंना नगरसेवक करण्याच्या हेतूने जिंदाशा मदार चौकात सुरू केल्याचे दिसून येत आहे.
मुळात शाब्दी हेच महिना दोन महिन्याला एकदा सोलापुरात येत असतात. आले तर लग्न समारंभ अशाचसाठी ते दिसत आहे. त्यात ही फोटोसेशन करून त्याचे फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर टाकले जातात. माध्यमांशी त्यांचा कधीही संपर्क येताना दिसत नाही.
आता महानगरपालिकेच्या निवडणुकीचे वातावरण तापण्यास सुरूवात होणार आहे परंतु, एमआयएम पक्ष हा सध्या सुस्थ अवस्थेत असून किमान 25 नगरसेवक देण्याची भाषा करणाऱ्या शाब्दी यांना ऐनवेळी तोंडघशी पडावे लागते का? असा प्रश्न त्यांचेच कार्यकर्ते उपस्थित करत आहेत. निवडणुका केवळ खासदार असुसूद्दीन ओवेसी व आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांच्याच सभा आणि जोरावर जिंकायच्या का? असाही प्रश्न कार्यकर्त्यांना पडला आहे.




















