राज्यातील 16 महापालिकेच्या निवडणुका या एक सदस्यीय प्रभाग पद्धतीने होणार आहे, त्यामुळे सर्वच राजकिय पक्ष कामाला लागले आहेत. सोलापूर शहरात मुस्लिम समाजात एमआयएम पक्षाची चांगली क्रेझ आहे. ही क्रेझ 2014 विधानसभा, 2017 महापालिका व 2019 च्या विधानसभा निवडणुकीत दिसून आली आहे.
याच दरम्यान शहराध्यक्ष फारूक शाब्दी, नगरसेवक गाझी जहागीरदार, नगरसेवक अझहर हुंडेकरी या तीन नेत्यांनी नुकतीच हैदराबाद वारी केली. पक्षाचे जिल्हा निरीक्षक अन्वर सादाद यांची भेट घेऊन ते पुढे पक्षाचे नेते खासदार अससुद्दीन ओवेसी यांच्या भेटीला गेले. त्याठिकाणी शहराध्यक्ष फारूक शाब्दी यांचीच ओवेसी यांच्या सोबत चर्चा झाली, तुम्ही चांगले काम करत आहेत, माझे कायम सोलापूर कडे लक्ष असते, येणारी महापालिका निवडणुक आपणास पूर्ण ताकदीने लढवायची आहे असे सांगत महिन्याभरात मी सोलापूर दौरा करणार असल्याचे खासदार ओवेसी यांनी आश्वासन दिले.
कोरोना काळ असल्याने ओवेसी यांची सभा नसेल पण समाजातील प्रमुख मान्यवर, पक्षाचे सर्व पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते यांची ते भेट घेणार असल्याचं सांगण्यात आलं. याच पार्श्वभूमीवर अनेक दिवसानंतर जिल्हा निरीक्षक अन्वर सादाद हे सोलापूर दौऱ्यावर येत आहेत, ते बैठक घेऊन आढावा घेतील.
2017 च्या निवडणूकित एमआयएम पक्षाने 36 जागा लढवल्या होत्या, त्यामध्ये 9 जागेवर एमआयएम विजयी झाले, 25 टक्के यश मिळाले, दरम्यान आता शहराध्यक्ष फारूक शाब्दी यांनी किमान 50 जागा लढवायच्या केवळ मुस्लिम नाही तर बौद्ध, मोची, मातंग, धनगर, भटक्या विमुक्त जाती या सर्वांना सोबत घेऊन निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी केली आहे. किमान 25 जागा जिंकून पक्षाला 50 टक्के यश आपल्या कारकीर्दीत मिळवून देण्याचे नियोजन त्यांचे आहे. युवा कार्यकर्त्यांच्या उमेदवारीवर त्यांचा भर राहणार आहे.

















