सोलापूर : आयुष्यात शिस्त व मेहनत महत्त्वाची आहे. या दोन्ही गोष्टीच्या बळावर आपण आयुष्यात यशस्वी होऊ शकतो. मी देखील जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकलेली आहे. जिल्हा परिषद शाळेत गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे व जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये सर्व सोईसुविधा पुरवणे हे माझे ध्येय असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी केले.
3 जानेवारी सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त जिल्हा परिषद सोलापूर व पंचायत समिती दक्षिण सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने दक्षिण सोलापूर तालुक्यातील सोमेश्वर हायस्कूल हत्तुर येथे आयोजित जिल्हास्तरीय किशोरी मेळाव्याप्रसंगी त्या बोलत होत्या.
यावेळी व्यासपीठावर प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रसाद मिरकले, उपशिक्षणाधिकारी किरणकुमारी कानडी, वैद्यकीय अधिकारी नीलिमा घोगरे, वर्षा पवार, शबनम शेख, हत्तुरचे सरपंच ज्योती कुलकर्णी, ऍड. सरोजनी तमशेट्टी, दक्षिण सोलापूरचे गटशिक्षणाधिकारी मल्हारी बनसोडे आदी उपस्थित होते.
यावेळी प्रास्ताविकेत प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रसाद मिरकले यांनी शिक्षण विभाग व महिला बालविकास विभागाच्या समन्वयाने दोन्ही विभागाचा विकास कुटुंबप्रमुख या नात्याने घडवून आणावयाचे आहे असे सांगितले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा. वडकबाळ ची इयत्ता पहिलीची विद्यार्थिनी अन्नपूर्णा पुजारी हिने ‘मी सावित्रीबाई फुले बोलते’ यावर मनोगत व्यक्त केले.
या मेळाव्यामध्ये विद्यार्थिनींच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी विविध स्पर्धा घेण्यात आल्या त्यामध्ये पोष्टर स्पर्धा,लिंबू चमचा, संगीत खुर्ची व रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या. यशस्वी विद्यार्थिनींना बक्षीसे देण्यात आले. तसेच आरोग्य विभागामार्फत 750 विद्यार्थिनींची एचबी तपासणी करण्यात आली.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन ज्योती वाघमारे व मंजूषा इरकशेट्टी यांनी केले. दक्षिण सोलापूरचे गटशिक्षणाधिकारी मल्हारी बनसोडे यांनी कार्यक्रमाचा मुख्य उद्देश सांगून आभार मानले. यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी राजशेखर नागणसुरे, जयश्री सुतार, गुरुबाळ सणके, बालविकास प्रकल्प अधिकारी श्री भोसले, सर्व केंद्रप्रमुख, सोमेश्वर हायस्कूल हत्तुर शाळेचे मुख्याध्यापक शिवयोगी शिक्षिका, शिक्षक व 750 विद्यार्थिनी उपस्थित होत्या