
“मामा…, अण्णा…” आमचा किसन भाऊ निवडून आला ”
सोलापूर : सोलापूरच्या महानगरपालिका निवडणुकीत काही लक्षवेधी लढती होत्या आणि त्या प्रभागांकडे संपूर्ण शहर जिल्ह्याचे लक्ष लागले होते त्यामधली एक महत्त्वाची लढत म्हणजे प्रभाग क्रमांक 22 मधली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी गटनेते किसान जाधव यांनी महापालिकेच्या रणधुमाळीत राष्ट्रवादीला सोडून जयकुमार गोरे, आमदार देवेंद्र कोठे आणि आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला होता.
पण प्रवेशाच्या दोनच दिवसानंतर अचानक काही घडामोडी घडल्या. तेव्हा ते पुन्हा राष्ट्रवादीत जात आहेत अशा चर्चा सुरू झाल्या, मात्र भाजपने त्यांच्या संपूर्ण पॅनलला उमेदवारी दिली. त्यामध्ये नागेश गायकवाड यांच्या पत्नी अंबिका गायकवाड, चेताली गायकवाड आणि दत्तात्रय नडगिरी यांना उमेदवारी मिळाली.
या प्रभागात किसन जाधव यांच्यावर मुस्लिम आणि आंबेडकरी समाज नाराज असलेल्या चर्चा ऐकण्यास मिळाल्या. मात्र मागील अनेक वर्षापासून त्या भागात नगरसेवक म्हणून काम करणाऱ्या किसन जाधव यांची सर्व समाजात चांगली ओळख असल्याचा फायदा या निवडणुकीत त्यांना झाला. विरोधात अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस, एमआयएम, काँग्रेस पक्ष यांचे मोठे आव्हान होते.
प्रचारात किसन जाधव यांनी होम टू होम प्रचारावर भर दिला. त्यांची निघालेली पदयात्रा ही सोलापूर शहरात लक्षवेधी ठरली.
परंतु या प्रभागात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लाडक्या बहिणींनी आपल्या किसन भाऊंना भरभरून दिले. आणि संपूर्ण पॅनल मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहे. या विजयानंतर या भागाचे नगरसेवक किसन जाधव नागेश गायकवाड यांनी आपले एक हाती वर्चस्व सिद्ध केले आहे.
























