महेश कोठे कित्येक वर्षानंतर काँग्रेस भवनात ; महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये रंगली ‘चाय पे चर्चा’
सोलापूर : पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे नेते महेश कोठे यांनी सुमारे दहा वर्षानंतर काँग्रेस भवनात पाहायला मिळाले. अण्णा काँग्रेस भवनात आल्याने अनेक त्यांचे जुने समर्थक यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये चाय पे चर्चा रंगल्याचे पाहायला मिळालं.
राज्याच्या गृहमंत्रालयाच्या विरोधात सोलापुरात काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध आंदोलन करण्यात आले शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या झालेल्या हत्येचा निषेध नोंदवून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
या आंदोलनाला महाविकास आघाडी मधील तीनही पक्षाचे प्रमुख नेतेमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या आंदोलनानंतर काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी उपस्थित सर्वच प्रमुख नेत्यांना काँग्रेस भवनामध्ये चहाचे निमंत्रण दिले. त्यांच्या विनंतीला मान देऊन सर्वच नेते काँग्रेस भवनाकडे गेले त्या ठिकाणी बराच वेळ चर्चा ही रंगली.
काँग्रेस भवनामध्ये यापूर्वी राष्ट्रवादी शिवसेनेचे अनेक नेते येऊन गेले आहेत, बहुतेक शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गणेश वानकर आणि जिल्हाप्रमुख अमर पाटील हे सुद्धा पहिल्यांदाच काँग्रेस भवनात गेले असतील. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत सुशीलकुमार शिंदे यांच्या झालेल्या पराभवानंतर महेश कोठे यांनीही काँग्रेस पक्ष सोडून शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर ते काँग्रेस भवनात आल्याचे पाहायला मिळाले नाहीत. पण अण्णांनी उपस्थिती लावून सर्वांसोबत चहा घेतला यामुळे सर्वच नेत्यांच्या चेहऱ्यावर उत्साह दिसून आला.