महादेव कोगणुरे यांनी बांधली शेतकऱ्यांची मोट ; 5000 शेतकरी आणि 500 महिलांना कायमस्वरूपी रोजगार मिळण्यासाठी रोल मॉडेल उभा करणार
सोलापूर : शेतकऱ्यांचा माल कमी भावात घेऊन जास्त भावाने विकणारा व्यापारी मात्र आज मालामाल होत आहे. आपला शेतकरी मात्र दिवसेंदिवस कंगाल होत चालला आहे. याला जबाबदार आपणच आहोत. कारण आपल्या शेतकर्यांना पिकवायची लाज नाही तर विकायची लाज वाटत असल्याचे मत शेतीमध्ये क्रांती घडवून आणणारे राष्ट्रपती पारितोषिक विजेते अभिनव फार्मस् ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर बोडके यांनी बोलताना व्यक्त केले. 5000 शेतकरी आणि 500 महिलांना कायमस्वरूपी रोजगार मिळण्यासाठी रोल मॉडेल उभा करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला.
एम. के. फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष तथा सागर सिमेंटचे मुख्य व्यवस्थापक महादेव कोगनुरे मित्र परिवार यांच्या वतीने निर्मिती लॉन्स येथे सेंद्रिय व जैविक शेती विषयक भव्य शेतकरी मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले होते. यावेळी शेतकर्यांना मार्गदर्शन करताना ज्ञानेश्वर बोडके हे बोलत होते.
पुढे बोलताना ज्ञानेश्वर बोडके म्हणाले, स्वत:च्या शेतात पिकवलेला माल शेतकरी जर स्वत: विक्री केल्यास त्याला चार पैसे अधिक मिळेल. कारण आज एक ही बाजार समिती शेतकर्याच्या हितासाठी नाहीत. आता शेतकर्यांना बदलावे लागेल. शेतकरी हा 140 कोटी जनतेचा अन्नदाता आहे. सध्याच्या शेतकर्यांनी शेती करण्याचे पॅटर्न बदलले पाहिजे. कायम रोजगार मिळविण्यासाठी काय करता येईल याचा विचार करुन शेती करणे गरजेची आहे. आता इतरासाठी नाही तर शेतकरी आता स्वत:साठी जगला पाहिजे. चपला एसी मधून खरेदी करता आणि पोटात जाणारा भाजीपाला मात्र रस्त्यावरून खरेदी करता. सध्या रासायनिक शेती घातक शेती बनत आहे. सध्या जैविक व विषमुक्त शेती करणे ही काळाची गरज आहे. एक आई घरात आणि एक गाय ( देशी ) दारात असेल तर आपला देश सुजलाम सुफलाम बनण्यास उशीर लागणार नाही म्हणून दुध, चहापत्ती आणि साखरेचा चहा पिऊ नका, गवती चहा पिऊन निर्व्यसनी जीवन जगण्याचा सल्ला यावेळी शेतकरी बांधवांना दिला.
यावेळी महादेव कोगनुरे बोलताना म्हणाले, सागर सिमेंट च्या माध्यमातून आणि मला मिळालेल्या मानधनावर मी समाजातील गरीब, गरजू लोकांपर्यंत पोहचून मी माझे समाजकार्य सुरु ठेवले आहे. परंतू काही लोकांना मात्र हे माझे काम त्यांना बघू वाटेना, म्हणून काही लोक माझी चेष्टा करतायत त्यांना करु द्या. परंतू ही चेष्टा देखील आशिर्वाद म्हणून स्वीकारून जिथं परिस्थिती गंभीर तिथे महादेव अधिक खंबीर असल्याचे सांगितले. कोणी किती ही बोलू द्या परंतू माझी समाजाशी जोडलेली नाळ मात्र कधीच तुटणार नसल्याचे सांगितले.
यावेळी दक्षिण सोलापूर,अक्कलकोट आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील अनेक शेतकरी आपले विचार व्यक्त करीत महादेव कोगनुरे यांना राजकारणात उतरण्याची विनवणी केली.