लोकसभा निवडणुकीसाठी कामाला लागा ; राष्ट्रवादी अजित पवार गटाची मुंबई येथे लोकसभा निहाय बैठक
सोलापूर:-आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या जागा वाटपाचा निर्णय चार ते पाच दिवसात होईल त्यामुळे कार्यकर्त्यांनी आता कामाला लागावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बुधवारी महिला विकास मंडळ यशवंतराव चव्हाण सेंटर समोर नरिमन पॉईंट मुंबई येथे ही बैठक पार पडली. या बैठकीस राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा खासदार प्रफुल पटेल, मंत्री छगन भुजबळ, धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील, मंत्री धर्मराव बाबा आत्राम, संजय बनसोडे, मोहोळचे आमदार यशवंत माने, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर, महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, माजी मंत्री दत्तात्रय भरणे, आमदार मकरंद पाटील, आमदार दीपक चव्हाण, करमाळा मतदारसंघाचे आमदार संजय शिंदे, सोलापूर जिल्हा अध्यक्ष दीपक साळुंखे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समिती विशेष निमंत्रित सदस्य किसन जाधव, माळशिरसचे सुरेश पालवे, मोहोळचे बापू भंडारे, अनिल सुरगेहळी, ओबीसी सेलचे कार्याध्यक्ष इरफान शेख, राष्ट्रवादी पार्टीचे सरचिटणीस तथा कोषाध्यक्ष शिवाजीराव गर्जे, अल्पसंख्यांक कार्याध्यक्ष वसीम बुरान, महिला प्रदेश पदाधिकारी श्रीमती लता ढेरे, सायरा शेख यांच्यासह शहरातील प्रदेश सदस्य व पदाधिकारी यांची उपस्थिती होती.
या बैठकीमध्ये सातारा व माढा लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीकडेच राहावा असा जोरदार आग्रह दोन्ही मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांनी यावेळी केला. त्यामुळे हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला मिळावा अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली. दरम्यान या बैठकीस किसन जाधव यांनी यावेळी मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार केला. यावेळी छगन भुजबळ यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण कामाला लागावे अशा सूचना देखील केल्या.