कुलदीप -कुमारांची सोलापुरात नवी उडान ; काय आहे हा प्रशासकीय उपक्रम
सोलापूर : जिल्हा प्रशासनाद्वारे Ai टेक्नॉलॉजीचा वापर करून नागरिकांना फोनद्वारे चौकशी करून तुमच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवण्यात येत आहे. नागरिकांच्या जास्त तक्रारी असतील तर आता तुमच्यावर कारवाई होणार आहे. Ai तंत्रज्ञानाच्या आधारावर देशातील पहिलाच प्रयोग सोलापूर जिल्हा प्रशासन करीत आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पत्रकार परिषदेत दिली.
जिल्हा प्रशासन सोलापूरच्या वतीने उडान-2025 अंतर्गत प्रशासनात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर व प्रशिक्षण हा कार्यक्रम बुधवार, दि. 30 एप्रिल रोजी जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित करण्यात होता. या AI प्रशिक्षणाचे उद्घाटन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याहस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, महिला व बालकल्याण अधिकारी प्रसाद मिरकले आदी मान्यवर उपस्थित होते. प्रशिक्षण कार्यक्रम उद्घाटन नंतर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
Ai टेक्नॉलॉजीचा वापर करीत नागरिकांची थेट संवाद साधून सरकारी कामकाजाविषयी तीन प्रश्न विचारले जात आहेत. प्रायोगिक तत्वावर शिक्षण, महिला व बालकल्याण, जिल्हा पुरवठा विभाग, पशुसंवर्धन व आरोग्य विभागाचा समावेश करण्यात आला आहे. Ai कक्षातून दररोज 15 ते 20 हजार नागरिकांशी संपर्क साधला जात आहे. या तंत्रज्ञानातून संपर्क साधलेल्या व्यक्तीला 30 सेकंदात तीन प्रश्न विचारले जातात. त्यातून जे उत्तरे मिळतात त्यावर काम केले जात आहे.
तुम्हाला रेशनचे धान्य मिळते का किती मिळते दुकान कधी उघडे असते असे प्रश्न विचारून संबंधित दुकानदाराबाबत माहिती घेतली जाणार आहे. यात बऱ्याच नागरिकांनी तक्रारी केल्यानंतर स्वतः जिल्हाधिकारी संबंधित विभाग प्रमुखाला कारवाईचे आदेश देणार आहेत. गावातील शाळा अंगणवाडी प्राथमिक आरोग्य केंद्र जनावराच्या दवाखान्याच्या कामकाजाविषयी अशी दररोज लोकांकडून माहिती घेतली जाणार आहे जिथे चांगले काम चालते तेथील अधिकाऱ्यांचा सन्मानही केला जाणार आहे. देशात या टेक्नॉलॉजीचा सोलापूर जिल्हा प्रशासन पहिलाच उपयोग करून घेत असून हा प्रयोग सक्सेस झाल्यास देशभर याचा उपयोग केला जाणार आहे. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद गेले चार महिने या नाविन्यपूर्ण उपक्रमावर काम करीत आहेत.