बालवाडी शिक्षिका व सेविका जिल्हाधिकारी कार्यालयात ; आम्हाला पण वेतनश्रेणी लागू करा
सोलापूर : बालवाडी शिक्षिका व सेविकांना सेवा श्वाश्वती देऊन त्यांना वेतनश्रेणी लागू करा. तसेच बालवाडी शाळांना बाल शिक्षण हक्क कायदा लागू करावा, यासह इतर मागण्यांसाठी बालवाडी शिक्षिका तसेच सेविकांनी निवासी उपजिल्हाधिकारी मनिषा कुंभार यांची भेट घेतली. त्यांच्या मागण्यांचे निवेदन दिले. मागण्यांसाठी आंदोलनाचा इशाराही यावेळी बालवाडी सेविकांनी दिला आहे.
शहर संघटक रवी नादरगी यांच्या नेतृत्वाखाली बालवाडी सेविकांनी आरडीसी मनिषा कुंभार यांची भेट घेतली. शासनाने नियुक्त केलेल्या फौजिया खान समितीच्या शिफारसी लागू कराव्यात, प्राथमिक शाळांना जोडून व स्वतंत्र असणाऱ्या सर्व बालवाडी शाळांना शासन मान्यता द्यावी, बालवाडी शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी राज्य शासनाने स्वीकारावी, बालवाडी अभ्यासक्रम निश्चित करावा, बालवाडी शाळांना शासनाने अनुदान द्यावे, बालवाडीच्या मुलांना शालेय पोषण आहार दिला जावा तसेच बालवाडी शाळांची वेळ सर्वत्र समान ठेवावी, अशा मागण्यांचे निवेदन आरडीसींना दिले.
यावेळी अध्यक्षा निशा केंचगुंडी, सचिवा पल्लवी दोड्डी, प्रसिद्धी प्रमुख अंबिका यनगुंडी यांच्यासह अनेक बालवाडी सेविका उपस्थित होत्या.