मोदींनी आयुष्यातली पहिली गॅरंटी पाळली नाही ते देशाला कसली गॅरंटी देणार ; मते मागायला आल्यास दोन लाख कोटींचा हिशोब मागा ; सोलापुरात निरंजन टकले गरजले !
सोलापूर : काँग्रेस पक्षाच्या वतीने जुळे सोलापूर परिसरातील टाकळीकर मंगल कार्यालय या ठिकाणी संकल्प सभेचे आयोजन झाले. त्या सभेला ज्येष्ठ पत्रकार निरंजन टाकले यांनी मार्गदर्शन केले. या मेळाव्याचे आयोजन कार्याध्यक्ष सुरेश हसापूरे यांनी केले होते.
यावेळी काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे, आमदार प्रणिती शिंदे, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, जिल्ह्याचे कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे, नूतन कार्याध्यक्ष नंदकुमार पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुधीर खरटमल, काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्यासह काँग्रेस राष्ट्रवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते पदाधिकारी यांच्यासह दक्षिण सोलापूर तालुका जुळे सोलापूर भागातील नागरिकांची प्रचंड गर्दी झाली होती.
पत्रकार टाकले यांनी केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच लक्ष केले. त्यांच्या धोरणांवर ते बरसले. मोदींनी देशात अच्छे नही लुच्छे दिन आणले या शब्दात त्यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली.
ते म्हणाले, मला खात्री आहे महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या 40 जागा निवडून येणार, आणखी जोर लावून लढले तर त्यापेक्षा जास्त जागा निवडून येतील असा दावा त्यांनी केला. आज देशाला सत्य, अहिंसा, प्रगती, सामाजिक समता हवी आहे पण भाजपला मात्र द्वेष हवा आहे. पण द्वेषाला शेवट असतो, भारत जोडो यात्रेत राहुल गांधी हेच सांगत आहेत. पूर्वी राम राम हा नमस्कार होता परंतु आज जय श्रीराम मध्ये धमकी दिसत आहे.
1947 ते 2014 साली 54 लाख कोटी कर्ज देशावर होते. 2024 मार्च मध्ये 206 लाख कोटी कर्ज झाले आहे. 152 लाख कोटी कर्ज दहा वर्षात मोदींनी कर्ज केले, रेल्वे विकली, विमाने विकली, आता ते मते मागायला येतील तेव्हा त्यांना 200 कोटींचा हिशोब मागा, मी देशाचा मालक आहे हिशोब दे मला ही तुमची भाषा असली पाहिजे.
भारताविरुद्ध प्रथमच ब्राझील व न्यूयॉर्कमध्ये खटले दाखल झाले आहेत हे आजपर्यंत कधीच झाले नव्हते. राहुल गांधींनी कर्नाटकात गॅरंटी दिली. त्याची योग्य अंमलबजावणी होऊ लागली. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांना गॅरंटी आठवली. तेव्हापासून ते मोदी की गॅरंटी म्हणत फिरत आहेत. ज्या यशोदाबेन यांना त्यांनी आयुष्यभर सोबत राहण्याची गॅरंटी दिली ते पाळू शकले नाहीत, ते देशाला कसली गॅरंटी देणार असा सवाल टकले यांनी केला.