दिलीप माने -काका साठे पुन्हा एकत्र येणार?
बीबीदारफळ काका साठे, नान्नज अविनाश मार्तंडे तर कोंडीतून पृथ्वीराज माने यांची चर्चा
सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेच्या 68 सदस्यांचे आरक्षण जाहीर झाले. यामध्ये अनेक दिग्गज नेत्यांना धक्का बसला आहे. विशेष करून राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार गटाचे जिल्हाध्यक्ष काका साठे यांचा पारंपारिक नान्नज जिल्हा परिषद मतदार संघ हा ओबीसी साठी राखीव झाला. त्यामुळे काकांना काहीशी अडचण झाली. नव्याने झालेला बीबीदारफळ हा जिल्हा परिषद गट सर्वसाधारण साठी खुला झाला आहे. त्याचबरोबर कोंडी हा जिल्हा परिषद गट सर्वसाधारण आहे.
काका साठे यांचा नान्नज हा जिल्हा परिषद गट ओबीसीसाठी राखीव झाल्याने कार्यकर्ते आणि स्वतः काका यांच्यात सोमवारी प्रचंड नाराजी दिसून आली. त्याला कारणही तसेच आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर उत्तर सोलापूर तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलली. काका साठे हे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असल्याने त्यांनी राजू खरे यांना निवडून आणले परंतु दुसरीकडे दिलीप माने यांनी माजी आमदार यशवंत माने यांना मदत केली तसेच मार्डीचे माजी सरपंच म अविनाश मार्तंडे हे सुद्धा दिलीप माने यांच्या सोबत गेले. त्यानंतर दिलीप माने आणि काका साठे यांच्यात दुरावा निर्माण झाला.
याच दरम्यान बाजार समितीची निवडणूक झाली तेव्हाही काका साठे यांनी बाजार समितीसाठी उमेदवारी अर्ज भरला होता पण दिलीप माने, आमदार सचिन कल्याणशेट्टी, सुरेश हसापुरे, शहाजी पवार, अविनाश मार्तंडे यांनी या निवडणुकीत बाजी मारली. काका साठे यांना माघार घ्यावी लागली. याच निवडणुकीत आमदार सुभाष देशमुख, काका साठे, आमदार विजयकुमार देशमुख, सिद्धाराम म्हेत्रे यांची एकी झाली होती.
त्यामुळे उत्तर तालुक्याचे सगळेच राजकीय समीकरणे फिसकटली. तालुक्यात काका साठे एकाची पडले दुसरीकडे दिलीप माने, शहाजी पवार, अविनाश मार्तंडे हे नेते मंडळी एका बाजूला आहेत.
आता जिल्हा परिषदेचे आरक्षण जाहीर झाल्याने आणि त्यातच बी बी दारफळ हा मतदारसंघ सर्वसाधारण साठी राखीव झाला. सध्या काका साठे यांनी वयाची 85 पार केली आहे ही निवडणूक म्हणजे त्यांच्या आयुष्यातील शेवटची निवडणूक आहे आणि जिल्हा परिषद हा काका साठे यांचा जीव की प्राण म्हणून ओळखला जातो. त्यामुळे काकांनी आयुष्यातली शेवटची निवडणूक लढवावी अशी कार्यकर्त्यांची मनोमन इच्छा आहे.
काका साठे यांनी अविनाश मार्तंडे यांच्यात जरी दुरावा निर्माण झाला असला तरी ते दोघे कधीही एकत्र येऊ शकतात. यासाठी माजी आमदार दिलीप माने आणि काका साठे हे दोन नेते जर एकत्र आले तर उत्तर सोलापूर तालुक्यातील तीनही जागा या दोन नेत्यांच्या गटाची येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
बी बी दारफळ जिल्हा परिषद मतदार संघातून पंचायत समितीचे माजी सदस्य इंद्रजीत पवार यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. सध्या शहाजी पवार हे दिलीप माने यांच्यासोबत आहेत आणि या गटांमध्ये पवार हे दावेदार मानले जातात. जर बीबी दारफळ जिल्हा परिषद गट हा ओबीसी साठी राखीव झाला असता तर तिथून निश्चित अविनाश मार्तंडे हे उमेदवार राहिले असते. आता नान्नज ओबीसी मधून उमेदवारी द्यायची कुणाला हा मोठा पेच काका यांच्यासमोर आहे.
परंतु कार्यकर्त्यांची मनमानी इच्छा अशी आहे की काका साठे आणि दिलीप माने यांनी यंदा पुन्हा एकत्र यावे. कारण काका यांची ही शेवटची निवडणूक असेल आणि काकांना पुन्हा जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये पाहायला सर्वांनाच आवडेल. याबाबत मंगळवारी जिल्हा परिषदेतील पत्रकारांनी काका साठे यांना छेडले असता त्यांनी तुम्ही म्हणलेले खऱ्यात उतरू असे सांगितले.
आता भविष्यात जिल्हा परिषदेच्या आरक्षणा नुसार राजकीय समीकरणे सुद्धा बदलण्याची शक्यता आहे. उत्तर तालुक्यातील या निवडणुकीत दिलीप माने हे काय निर्णय घेतात यावर काका साठे, अविनाश मार्तंडे आणि इंद्रजीत पवार या तीनही नेत्यांचे भवितव्य अवलंबून आहे.