दक्षिण मध्ये खळबळ होणार ; परिवर्तन अपक्षांना सोबत घेऊन एकच उमेदवार देणार ; या नेत्यांचा पुढाकार
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघांपैकी दक्षिण सोलापूर विधानसभा या मतदारसंघात सर्वाधिक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरले आहेत. या ठिकाणी महाविकास आघाडीमध्ये बिघाडी सुद्धा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दक्षिण विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार सुभाष देशमुख, महाविकास आघाडीतून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमर पाटील, अपक्ष म्हणून माजी आमदार दिलीप माने, अपक्ष धर्मराज काडादी, दक्षिण परिवर्तन विकास आघाडी कडून युवराज राठोड, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून महादेव कोगनुरे, वंचित बहुजन आघाडी कडून संतोष पवार, प्रहार पक्षाकडून बाबा मिस्त्री, अपक्ष म्हणून सोमनाथ वैद्य, श्रीशैल मामा हत्तूरे, शिवसेनेचे अन्नप्पा सत्तूबर, सचिन सोनटक्के असे सुमारे 40 हून अधिक उमेदवार दक्षिणच्या रिंगणात आहेत.
दक्षिण मध्ये सध्या निवडणूक रंगतदार अवस्थेत आली आहे. या मतदारसंघात प्रस्थापित राजकारण्यांविरोधात तसेच आजपर्यंत राजकीय सत्ता स्थानामध्ये संधी न मिळालेल्या कार्यकर्त्यांनी युवराज राठोड यांच्या नेतृत्वाखाली परिवर्तन विकास आघाडी स्थापन केली आहे.
बुधवारी उमेदवारी अर्जांची छाननी झाली. त्यानंतर परिवर्तन विकास आघाडीचे युवराज राठोड यांनी परिवर्तन मधील आपल्या सहकाऱ्यांसोबत काही अपक्ष आणि इतर पक्षांच्या उमेदवारांसोबत चर्चा केली. या चर्चेमध्ये सर्वांनी मिळून स्वतंत्र लढण्यापेक्षा समन्वय ठेवून एकच उमेदवार दिला तर निश्चित आपण चांगले लढत देऊ असा सूर पुढे आला.
त्यामुळे आता दक्षिण सोलापूर परिवर्तन विकास आघाडी आणि इतर काही अपक्ष व काही पक्षांची एकत्रित बैठक रविवारी होणार असून एकच उमेदवार देण्याचा निर्णय जवळजवळ निश्चित झाल्याचे युवराज राठोड यांच्या समर्थकांकडून समजले आहे.