“मस्त चाललय माझं” ! दक्षिण मध्ये सुभाष देशमुखांचा रनवे झाला वनवे…..
राजकारणामध्ये सध्या “किती बी समोर येऊ द्या, त्यांना एकटा बास” हे गाणं चांगलंच गाजतंय. या गाण्याचे बोल दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार सुभाष देशमुख यांना पुरेपूर लागू पडते. त्याला कारण हे तसेच आहे सुभाष देशमुख हे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत.
दक्षिण मध्ये सध्या महाविकास आघाडीमध्ये स्पष्टपणे बिघाडी झाली आहे. महायुती मध्ये काहीशी बिघाडी झाली असली तरी ते उमेदवार तितके प्रभावी नाहीत. त्यामुळे सध्याची राजकीय आणि दक्षिण विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीचे वातावरण पाहता “मस्त चाललय माझं” असंच सुभाष देशमुख यांच्या बाबतीत म्हणावं लागेल.
लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेस पक्षाला तयार झालेले वातावरण आणि भारतीय जनता पार्टी बॅक फूटवर गेल्याने दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात भाजप विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत होईल अशी चिन्ह होती परंतु सिद्धेश्वर परिवाराचे नेते धर्मराज काडादी यांची एन्ट्री दक्षिणचा राजकारणात झाल्याने सर्वच समीकरणे बिघडली.
त्यातच महाविकास आघाडीतून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमर पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली. दिलीप माने यांच्या बाबतीत बराच गोंधळ झाला. नाईलाजास्तव त्यांना या निवडणुकीतून माघार घ्यावी लागली. दिलीप माने नसल्याने भारतीय जनता पार्टीला ही निवडणूक सोपी जाणार असल्याचे चित्र आहे.
धर्मराज काडादी यांच्या पाठीशी आता काँग्रेसने आपली ताकद लावली आहे. दिलीप माने हे सुद्धा काडादी यांना जॉईन झाले आहेत. परंतु धनगर समाजाची भूमिका स्पष्ट झालेली नाही.
त्यातच मुस्लिम समाजातून बाबा मिस्त्री हे प्रहारचे उमेदवार आहेत काँग्रेसकडून तयारी केलेले महादेव कोगनुरे यांनी मनसेचे उमेदवारी घेतली आहे. अमर पाटील हे महाविकास आघाडीचे असल्याने या सर्व नेत्यांमध्येच मतांची विभागणी होण्याची शक्यता आहे.
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांना दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात पडलेली मते आणि भाजपला मिळालेली मते याचे जर गणित घातले तर भारतीय जनता पार्टीची मते ही सध्याच्या परिस्थितीनुसार विजयाची मते आहेत. काँग्रेस पक्षाच्या मतांमध्ये निश्चित विभाजन होण्याची शक्यता नाकारता येत नाही पण भाजपची मते हे फिक्स असतात त्यामुळे या सर्वांच्या भांडणात सुभाष देशमुख वनवे निघणार अशी चर्चा भाजपच्या कार्यकर्त्यांमधून ऐकण्यास मिळत आहेत.