सोलापूर : संसदेच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरून लोकसभेमध्ये गृहमंत्री अमित शहा यांच्या निवेदनाची मागणी करणार्या विरोधी पक्षांच्या तब्बल 145 खासदारांना सभागृहातील गैरवर्तनाच्या कारणाखाली निलंबित करण्यात आले.
या विषयाचे पडसाद आता संपूर्ण देशभरात उमटले आहेत. देशातील इंडिया आघाडीच्या घटक पक्षांनी एकत्रित येऊन या विरोधात आंदोलनाची हाक दिली आहे. सोलापुरात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी आमदार ज्येष्ठ नेते आडम मास्तर यांच्या नेतृत्वाखाली शासकीय विश्रामगृहावर इंडिया आघाडीतील घटक पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली.
या बैठकीला माजी आमदार प्रकाश यलगुलवार, शिवसेनेचे माजी मंत्री उत्तम प्रकाश खंदारे, काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अजय दासरी, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष भारत जाधव, माजी महापौर जनार्दन कारमपुरी, माजी शहराध्यक्ष शंकर पाटील, माजी महापौर संजय हेमगड्डी, बाबा मिस्त्री, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव एम एच शेख, प्रमोद गायकवाड, समाजवादी पार्टीचे इसाक डोका, आबुतालिब डोंगरे यांची उपस्थिती होती.
या बैठकीत खासदार निलंबनाचा तीव्र शब्दात निषेध नोंदवण्यात आला तसेच या घटनेचा सामूहिक निषेध करण्यासाठी शुक्रवार सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकत्रित येऊन निषेध आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला.