धर्मराज काडादी संघर्ष योद्धा ; लोकसभेत पहिला प्रश्न शेतकऱ्यांचा मांडेन ; प्रणिती शिंदेंचा शब्द ; ‘सिध्देश्वर’च्या दहा हजार सभासदांचा पाठिंबा
सोलापूर : सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक धर्मराज काडादी यांनी काँग्रेस महा विकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ कारखाना परिसरातील त्यांच्या मंगल कार्यालयामध्ये आपल्या कारखान्याच्या सभासदांचा भव्य असा मेळावा घेतला. तब्बल दहा हजारांहून अधिक सभासद मेळाव्याला उपस्थित होते.
यावेळी ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, उमेदवार प्रणिती शिंदे, माजी आमदार दिलीप माने, दक्षिणचे नेते सुरेश हसापुरे, अमर पाटील, मल्लिकार्जुन पाटील, प्रकाश वानकर, सिध्देश्वरचे चेअरमन पुष्कराज काडादी, बाळासाहेब शेळके, भारत जाधव, जयदीप साठे यांच्यासह दक्षिण, उत्तर, अक्कलकोट तालुक्यातील लिंगायत समाजातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रणिती शिंदे म्हणाल्या, ही लढाई आता माझी एकटीची राहिली नसून तुमची आहे, एकवेळ मला साथ द्या, पुढची लढाई मी स्वतः लढेन, धर्मराज काडादी हे संघर्ष योद्धा आहेत, भाजपच्या नेत्यांनी त्यांना किती त्रास दिला, चिमणी पाडली, अडचणी आणल्या, होम मैदानाच्या विषयावर तर यांना आंदोलन करावे लागले, काडादी यांच्या जागी दुसरे कुणी असते तर कधीच भाजपमध्ये गेले असते, पण ते ठाम राहिले, अशा संघर्ष योद्धा सोबत मी कायम राहीन, लोकसभेत तुम्ही खासदार म्हणून पाठविल्यावर पाहिला प्रश्न शेतकर्यांचा मांडेन, शेतकरयांना लोड शेडींग मुक्त करेन असा शब्द उमेदवार प्रणिती शिंदे यांनी दिला.
यावेळी धर्मराज काडादी, सिध्दाराम म्हेत्रे, मल्लिकार्जुन पाटील, जयदीप साठे यांनी आपल्या भाषणातून भाजपचे उमेदवार राम सातपुते यांच्यावर तोफ डागत प्रणिती शिंदे यांना या निवडणुकीत विजयी करण्याचे आवाहन केले.