सोलापुरात शहर उत्तरसाठी काँग्रेसचा राष्ट्रवादी विरोधात नारळ फुटला ; शहराध्यक्षांची कार्यकर्त्यांना तंबी
सोलापूर : सोलापूर शहर उत्तर विधानसभा आयोजित काँग्रेसच्या 100 निष्ठावंतांची बैठक शुक्रवारी पार पडली. या बैठकीत शहर उत्तर हा मतदारसंघ काँग्रेसला मिळाला यासाठी जोर लावण्याचा एकच निर्धार करण्यात आला.
स्वर्गीय बाबुराव चाकोते यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून बैठकीची सुरुवात झाली. माजी आमदार विश्वनाथ चाकोते यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस, शहराध्यक्ष चेतन नरोटे, सेवादल यंग ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष सुदीप चाकोते, माजी सभापती सुनील रसाळे, दत्तू बंदपट्टे, राजेंद्र कासवा, हेमा चिंचोळकर, अशोक कलशेट्टी, एन के क्षिरसागर, रियाज बागवान, रेवणसिध्द आवजे, संध्या काळे, वीणा देवकते यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसला काही कार्यकर्ते टार्गेट करताना दिसून आले जेव्हा अध्यक्ष चेतन नरोटे हे भाषणाला उठले तेव्हा त्यांनी कार्यकर्त्यांना एकच तंबी दिली, आपला विरोधक हा भाजप आहे, त्यामुळे मित्र पक्ष असलेल्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादी वर टीका करू नका, लोकसभा निवडणुकीत यंत्रणा कशी राबली हे मला माहित आहे, माझ्या समोर टीका करताना मी गप्प कसा बसणार तुम्हाला काय बोलायचे ते मला बोला, आपण चर्चा करू या शब्दात त्यांनी आपली भूमिका मांडली.
यानंतर एन के क्षिरसागर यांनी राष्ट्रवादी कडून आपणाला हा मतदारसंघ घ्यावाच लागेल कारण शरद पवार यांनीच जिथे उमेदवार निवडून येऊ शकतो ती जागा घ्यायची असे सांगितले आहे त्यामुळे शहर उत्तर आपल्या कडेच घ्यावे यासाठी जोर लावा असे आवाहन केले.