सोलापुरात पारधी समाजाची व्यायाम शाळा जाळली ! समाज आला जिल्हाधिकारी कार्यालयात
सोलापूर : सोलापूर शहरातील सेटलमेंट भागात असलेल्या पारधी समाजाचे मंदिर आणि व्यायामशाळा परिसरातील समाजकंटकांनी जाळून समाजातील युवकांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याबद्दल जय कालिका आदिवासी पारधी समाज सामाजिक संस्थेच्या वतीने समाजातील शेकडो नागरिक एकत्र येऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.
जय कालिका आदिवासी संस्थेचे अध्यक्ष महेश काळे यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी समाजातील महिला युवक ज्येष्ठ नागरिक हे एकत्र आले होते त्यांनी दुपारी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना निवेदन देऊन आपली कैफियत मांडली.
29 जुलै रोजी रात्री साडेआठच्या दरम्यान सेटलमेंट फी भागातील काही गायकवाड आडनावाच्या युवकांनी सचिन चव्हाण याला हटकून त्याला मारहाण करत जातीवाचक शिवेगाळ केली होती. त्यानंतर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यानंतरही गायकवाड कंपनी दाखल झालेला गुन्हा मागे घेण्यासाठी जीवे मारण्याची धमकी देत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. यानंतर चिडून त्या लोकांनी समाजाच्या व्यायामशाळेला आग लावून आतील साहित्य आणि मंडळाची गणेश मूर्ती याची नासधूस केली आहे.
यावेळी मनोज काळे, पार्वती काळे, राजेंद्र काळे, मारुती काळे, मंजुनाथ काळे, रवीना चव्हाण, शंकर चव्हाण, मंथन काळे, मयूर काळे, सिद्धूबाई काळे, कविता चव्हाण, मनीषा काळे, सुमित्रा काळे यांच्यासह पारधी समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.