सोलापुरात नरेंद्र- देवेंद्रची जमली जोडी ; शिस्तीत विधानसभेचे नियोजन सुरू
सोलापूर : सोलापूर लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांना पराभवाला सामोरे जावे लागले. लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान शिवसेनेचे माजी नगरसेवक सोलापुरात तीन राजकीय प्रस्थ म्हणून समजले जाणाऱ्या कोठे घराण्यातील देवेंद्र कोठे यांनी भाजप शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांच्या जोडीने राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी देवेंद्र कोठे यांची जबाबदारी स्वीकारली.
त्यानंतर देवेंद्र कोठे यांनी त्यांना जबाबदारी दिलेल्या शहर मध्य या काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसच्या एक गठ्ठा मतांना सुरुंग लावत मोठ्या मताधिक्यापासून रोखले. या निवडणुकीत देवेंद्र कोठे यांचे काही स्टेटमेंट वादग्रस्त ठरले परंतु त्यांना दिलेली जबाबदारी आपण व्यवस्थित पार पाडल्याचा दावा त्यांनी केला आहे.
आता शहराध्यक्ष नरेंद्र काळे आणि देवेंद्र कोठे या दोघांची जोडी चांगलीच जमली आहे. नरेंद्र- देवेंद्र यांनी आता शिस्तीत आगामी विधानसभा निवडणुकीसाठी नियोजन सुरू केले आहे. भारतीय जनता पार्टीला शहर मध्य मतदारसंघांमध्ये मिळालेले मताधिक्य पाहता देवेंद्र कोठे यांनी मोर्चे बांधणी सुरू केल्याचे बोलले जात आहे.
या जोडीने भाजपचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या प्रभाग नऊ मध्ये महासेवा शिबिर आयोजित केले आहे. या शिबिरात मतदार नोंदणी, आधार नोंदणी, रेशन कार्ड दुरुस्ती, श्रम कार्ड नोंदणी, आयुष्यमान भारत कार्ड नोंदणी असा लाभ या भागातील नागरिकांना देण्यात येणार आहे.