सोलापूर जिल्ह्यातील या ताई महिला दिनी पुरस्काराने भारावल्या ! सीईओ साहेबांनी असे केले कौतुक
सोलापूर : जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने , जिल्हा परिषद महिला व बालविकास विभागामार्फत आदर्श अंगणवाडी सेविका, मदतनीस व पर्यवेक्षिका पुरस्काराचे वितरण आज रोजी करण्यात आले. सोलापूर जिल्हयामध्ये ग्रामीण क्षेत्रात ४०७६ अंगणवाडी केद्र कार्यरत असून सदर अंगणवाडी केंद्रांव्दारे योजनोच्या सेवा देणाऱ्या अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्या कामाचे कौतूक करणेसाठी दिनांक ८ मार्च रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून जिल्हयातील १६ प्रकल्पातील प्रति प्रकल्प ३ याप्रमाणे एकूण ४८ अंगणवाडी सेविका, ४८ अंगणवाडी मदतनीस प्रति प्रकल्प १ याप्रमाणे १६ अंगणवाडी पर्यवेक्षिकांना आदर्श पुरस्काराने गौरविण्यात आले.
सदर सोहळयास जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला व बालविकास प्रसाद मिरकले, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मिनाक्षी वाकडे तसेच सामान्य प्रशासन विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांचेसह जिल्हयातील बालविकास प्रकल्प अधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी अंगणवाडी ताईंचे काम हे समाजासाठी प्रेरणादायी असून त्यांचेमार्फत ग्रामीण क्षेत्रातील बालकांचे कुपोषण निर्मुलनाचे कामकाज केले जावून सशक्त भारत घडविण्याचे काम केले जात असलेबाबत सर्व अंगणवाडी सेविकांचे अभिनंदन केले. सध्या शासनामार्फत सुपोषित ग्रामपंचायत हे अभियान राबविण्यात येत असून सदर अभियानामध्ये सर्व अंगणवाडी सेविका या अत्यंत तळमळीने काम करत असून चालू वर्षी सोलापूर जिल्हा कुपोषणमुक्त करणेबाबत सर्व अंगणवाडी सेविकांना आवाहन केले.
आदर्श अंगणवाडी पर्यवेक्षिका, सेविका व मदतनीस सोहळा हा जामगोंडी लॉन्स सोलापूर येथे आयोजित केला होता. यावेळी जिल्हयातील अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका व बालविकास प्रकल्प अधिकारी उपस्थित होते. यावेळी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या कला गुणांना वाव मिळणेच्या उददेशाने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
कार्यक्रमात बालविकास प्रकल्प अधिकारी , अंगणवाडी पर्यवेक्षिका तसेच जिल्हयातील विविध प्रकल्पातील अंगणवाडी सेविका यांनी गीत गायन, सामुहिक नृत्य तसेच एकपात्री असे विविध कार्यक्रमांचे सादरीकरण करून उपस्थितांना मन जिंकले.
याप्रसंगी जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले यांनी प्रथम अंगणवाडी पर्यवेक्षिका , अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे कामाबाबत समाधान व्यक्त केले व यापुढेही कुपोषण निर्मुलनाबाबत भरीव योगदान देणेबाबत आवाहन केले. तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी जिल्हयातील १० वर्षे पूर्ण झालेल्या १३, २० वर्षे पूर्ण झालेल्या ८ तर ३० वर्षाचे ४ अंगणवाडी पर्यवेक्षिकांना बऱ्याच वर्षापासून प्रलंबित असणाऱ्या आश्वासित योजनेचा लाभ देवून महिला दिनाची भेट दिली.
कार्यक्रमाचे यशस्वी होणेसाठी सहायक प्रशासन अधिकारी प्रताप रुपनर, कनिष्ठ प्रशासन अधिकारी शिवानंद मगे, विस्तार अधिकारी श्रीकांत मेहरकर, वरिष्ठ सहायक रेणूका प्रथमशेटटी, परमेश्वर पांचाळ, कनिष्ठ सहायक साहेबराव देशमुख व परिचर अनिता वसेकर यांनी परिश्रम घेतले.