

राज्यातील नगरपरिषद, नगरपालिका व नगरपंचायत साठी मंगळवारी अतिशय उत्साहाने आणि चुरशीने मतदान झाले. सोलापूर जिल्ह्यातील 12 नगरपालिकांची निवडणूक सध्या गाजत आहे. जिल्ह्यातील अकलूज, मोहोळ, अनगर, पंढरपूर, अक्कलकोट, दुधनी या नगरपालिकांच्या निवडणुकीने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
अक्कलकोट तालुक्यातील अक्कलकोट, दुधनी व मैंदर्गी या तीन नगरपालिकांची निवडणूक आहे. या तालुक्यात विद्यमान आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे या दोन्ही नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
अक्कलकोट मध्ये सचिन कल्याणशेट्टी यांचे बंधू मिलन कल्याणशेट्टी हे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत तर दुसरीकडे दुधनी नगरपालिकेसाठी सिद्धाराम म्हेत्रे यांचे पुतणे प्रथमेश म्हेत्रे हे उमेदवार आहेत.
म्हेत्रे यांच्या प्रचारार्थ माजी मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा झाली तर मिलन कल्याणशेट्टी यांच्या प्रचारार्थ राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे येऊन गेले.
मंगळवारी अतिशय चुरशीने अक्कलकोट तालुक्यात मतदान झाले. सचिन कल्याणशेट्टी यांनी तीनही नगरपालिकेमध्ये भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार उभे केले आहेत. त्यामुळे त्यांच्या वर्चस्वासी ही लढाई आहे.
मैंदर्गी या ठिकाणी मतदानाची पाहणी करत असताना आमदार कल्याणशेट्टी यांनी एका बुथवर महिला कार्यकर्त्या बसल्या होत्या. हे पाहून ते स्वतः बूथवर जाऊन बसले आणि त्यांनी मतदारांना स्लीप लिहून दिल्या.
हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे आपल्या फेसबुकवर सचिन कल्याणशेट्टी यांनी हा फोटो टाकत “नारीशक्ती जिंदाबाद” अशी म्हणून पोस्ट केली आहे. या निवडणुकीची मतमोजणी 3 डिसेंबरला होणार होती मात्र निवडणूक आयोगाने ही मतमोजणी पुढे ढकलून 21 डिसेंबरची तारीख दिली आहे त्यामुळे 19 दिवस आता उमेदवारांना आपले देव पाण्यात ठेवावे लागणार आहेत.



















