ब्रेकिंग : सोलापुरात येणकीच्या सरपंचाला विभागीय आयुक्तांचा दणका ; थेट घरी बसवले ! बियरबार भोवला रे बाबा
सोलापूर : बोगस ग्रामसभा दाखवून बियर बारला नाहरकत प्रमाणपत्र देणाऱ्या मोहोळ तालुक्यातील येणकी ग्रामपंचायतचे सरपंच पोपट केशव जाधव यांना विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांनी थेट सरपंच व सदस्यपदावरून हकालपट्टी केली आहे. तसे आदेश 5 ऑगस्ट 2025 रोजी काढले.
विभागीय आयुक्तांनी या सरपंचाला घरी बसवल्याने हा मोहोळ तालुक्यातील प्रस्थापित नेत्यांना एक प्रकारचा धक्का मानला जात आहे. येणकी गावचे उपसरपंच आकाश खरात यांनी याबाबत तक्रार केली होती. माजी सरपंच ज्येष्ठ नेते हरिभाऊ घुले यांनी ही हे प्रकरण लावून धरले होते. सदर प्रकरणात यापूर्वी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी ग्रामसेवक एन व्ही काशीद यांना निलंबित केले आहे.
सरपंच आणि ग्रामसेवकाने संगणमताने 11 एप्रिल 2022 रोजी बोगस ग्रामसभा दाखवून राजरत्न बियर बार साठी ना हरकत प्रमाणपत्र दिले होते. त्या विरोधात उपसरपंच खरात यांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. हे प्रकरण नंतर ग्रामपंचायत उपमुख्य कार्यकारी अधिकारी त्यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे जाऊन या प्रकरणाची चौकशी झाली. ग्रामसभेची दवंडी देणारे शिवाजी संभा वाघमारे यांनी दोन वेळा दिलेले प्रतिज्ञापत्र यामध्ये सुद्धा तफावत दिसून आली.
या प्रकरणात ग्रामपंचायतीने ग्रामसभा ठराव, ग्रामसभा अजेंडा, ग्रामसभा उपस्थिती पत्रक, ग्रामसभा दवंडी रजिस्टर हे प्रत्येक वर्षी नवीन तयार करणे, ग्रामसभेबाबतचे व्हिडीओ चित्रीकरण करावे असे निर्देश असताना ११ एप्रिल २०२२ रोजीच्या ग्रामसभेचे व्हिडीओ चित्रीकरण न करणे, शिस्तभंगाचे कारवाईस पात्र असल्याचे कारण पुढे करीत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी ग्रामसेवक काशीद यांना निलंबन केले होते.
सरपंच जाधव यांच्याविरुद्धचे प्रकरण विभागीय आयुक्त यांच्यासमोर चालून त्यांनी पाच ऑगस्ट रोजी या प्रकरणात निकाल दिला.
या निकालात जाब देणार पोपट केशव जाधव, सरपंच, ग्रामपंचायत येणकी, ता. मोहोळ, जि. सोलापूर यांना ग्रामपंचायतीचे उर्वरित कालावधीसाठी ग्रामपंचायतीचे सरपंच व सदस्य पदावरुन काढून टाकणेत येत आहे.
या निकालानंतर हरिभाऊ घुले यांनी समाधान व्यक्त केले असून श्री जकराया यांनीच या प्रकरणात न्याय दिल्याची भावना व्यक्त केली.