प. पू. गुरुलिंग जंगम महास्वामीनीं अतिरुद्र स्वाहाकाराचे घेतले दर्शन
सोलापूर : श्री बसवारूढ महास्वामीजी मठाकडून समाजाला धर्माच्या मार्गावर नेण्याचे कार्य सुरू आहे, असे गौरवोद्गार कतमरी मठाचे प. पू. गुरुलिंग जंगम महास्वामीजी यांनी केले.
श्री श्री श्री बसवारूढ महास्वामीजी मठ ट्रस्टतर्फे प. पू. गुरुलिंग जंगम महास्वामीजी आणि कर्नाटकातील सेडम येथील माजी राज्यसभा खासदार बसवराज पाटील यांचा सन्मान करण्यात आला.
मठातर्फे सुरू असलेल्या अतिरुद्र स्वाहाकाराचे दर्शन बुधवारी प. पू. गुरुलिंग जंगम महास्वामीजी आणि माजी खासदार बसवराज पाटील यांनी घेतले. यावेळी रुद्रयंत्र, नेपाळहून आलेली रुद्राक्षाची माळ, शाल आणि पुष्पहार घालून दोघांचा मठाधिपती श्रो. ब्र. श्री. शिवपुत्र महास्वामीजी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर प्रधान आचार्य पंडित गोविंद शास्त्री जोशी, प. पू. श्रो. ब्र. श्री. जडेसिध्देश्वर महास्वामीजी, स्वागताध्यक्ष विशाल बन्सल उपस्थित होते.
प. पू. गुरुलिंग जंगम महास्वामीजी म्हणाले, धर्म संस्थापनेचे कार्य करणारे काल होते, आज आहेत आणि उद्याही असतील. संतांचा जन्म जगाच्या कल्याणासाठी असतो. ते परोपकारासाठी आपला देह कष्टवितात. समाज चुकीच्या मार्गावर जात असेल तर संतांच्या शिकवणुकीमुळे समाजाला योग्य दिशा प्राप्त होते. श्री श्री श्री बसवारूढ महास्वामीजी मठ समाजाला योग्य दिशेने नेण्याचे काम करत आहे. या मठाची कीर्ती भविष्यात संपूर्ण भारतात जाईल. श्री श्री श्री बसवारूढ महास्वामीजी मठ धर्माचे शक्ती केंद्र बनेल, असेही प. पू. गुरुलिंग जंगम महास्वामीजी यांनी सांगितले.
माजी खासदार बसवराज पाटील म्हणाले, अतिरुद्रासारख्या यागामुळे वातावरण शुद्ध होते. शुद्ध अन्न, शुद्ध पाणी आणि शुद्ध हवेची सध्या सर्वाधिक गरज आहे. गेल्या ५० ते ६० वर्षांपासून आपण जमिनीत रासायनिक खतांचा भरमसाठ मारा केला आहे. त्याचा परिणाम मानवी जीवनावर होत आहे. शुध्द पाणीदेखील विकत घेऊन प्यावे लागत आहे. यावर उपाय म्हणून केमिकल विरहित अन्नाचे सेवन आपण केले पाहिजे. विश्वाच्या शांतीसाठी, धर्म जागृतीसाठी आणि देशाचे नाव जगात उंचावण्यासाठी अतिरुद्र केला जात आहे, ही कल्पनाच कौतुकास्पद आहे, असेही माजी खासदार बसवराज पाटील याप्रसंगी म्हणाले.
प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन महेश भंडारगोटे यांनी केले. स्वागताध्यक्ष विशाल बन्सल यांनी आभार प्रदर्शन केले.