50 हजाराची लाच घेताना कृषी विभागाचा तंत्र अधिकारी अटकेत ; गाडीत सापडले सहा लाख रुपये
खत व शेती औषधे निर्मितीच्या कंपनीत सॅम्पल घेऊन यावर तक्रारदार यांच्यावर कोणतीही कारवाई न करण्याकरिता पन्नास हजाराची लाच घेणाऱ्या पुणे विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयातील तंत्र अधिकाऱ्यास रंगेहात पकडण्यात आले आहे. तसेच त्याच्या गाडीत रक्कम ठेवणारा खाजगी इसम आणि गाडीतील सहा लाख 14 हजाराची रक्कम ही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतली आहे.
आलोसे दत्ता नारायण शेटे, वय ४२ वर्षे, पद- तंत्र अधिकारी (गुणवत्ता नियंत्रण), नेमणूक विभागीय कृषी सह संचालक कार्यालय पुणे, म्हाडा कॉलनी मोरवाडी, पिंपरी पुणे व खाजगी इसम प्रमोद वाल्मीक सुरवसे, वय ३९ वर्षे, व्यवसाय शेती, हरीहर महाराज मठाजवळ पंढरपूर या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे.
यातील तक्रारदार यांचे मालकीची खते व शेती औषधे निर्मीतीची कंपनी असून सदर कंपनीतुन उत्पादन झालेले खते व शेती औषधांचे सॅम्पल घेवुन त्यावरुन तक्रारदार यांचे कंपनीवर कोणतीही कारवाई न करण्याकरीता यातील आलोसे दत्ता नारायण शेटे, पद- तंत्र अधिकारी (गुणवत्ता नियंत्रण), नेमणूक विभागीय कृषी सह संचालक कार्यालय पुणे, यांनी तक्रारदार यांच्याकडे ५०,००० रुपये लाचेची मागणी करुन सदरची लाच रक्कम स्वतः स्विकारुन ती लाच रक्कम खाजगी इसम प्रमोद सुरवसे यांचेकरवी त्यांचे शासकीय वाहनामध्ये ठेवली असताना वर नमुद आरोपींताना रंगेहात पकडण्यात आले आहे.
तसेच लाच रक्कम मिळून आलेल्या शासकीय वाहनाची झडती घेतली असता सदर शासकीय वाहनामध्ये लाच रक्कमे व्यतिरिक्त भारतीय चलनी नोटांचे वेगवेगळे एकुण १७ बंडल मिळुन आले असुन त्यामध्ये एकुण ६,१४,०००/- रुपये मिळुन आले आहेत. त्या रक्कमेबाबत आलोसे शेटे यांनी समाधानकारक स्पष्टीकरण न दिलेने सदरची रक्कम जप्त करण्यात येवून वर दोन्ही आरोपी यांचे विरुध्द गुन्हा नोंद करणेची प्रक्रिया चालू आहे.
सदरची कारवाई उमाकांत महाडिक, पोलीस निरीक्षक, एसीबी, सोलापूर. पोलीस अंमलदार पोह अतुल घाडगे, पोह सलिम मुल्ला पोना स्वामीराव जाधव, चापोह राहुल गायकवाड, सर्व नेम. एसीबी, सोलापूर यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.