सोलापूरात तीन डीसीपी, चार एसीपी यांच्या नेतृत्वात 800 पोलिसांचा ताफा राहणार तैनात
सोलापूर : नववर्षाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच 31 डिसेंबरच्या रात्री सोलापूर शहरात तब्बल 800 हून अधिक पोलिसांचा ताफा तैनात राहणार आहे. बहात्तर ठिकाणी फिक्स पॉईंट तर तेरा ठिकाणी नाकाबंदी पॉईंट राहणार असून मुलींच्या संरक्षणासाठी दामिनी पथक नियुक्त करण्यात आले आहे. पोलीस उपायुक्त दिपाली काळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.
> यामध्ये शहरात एकूण ७२ ठिकाणी फिक्स पॉईन्ट लावण्यात आले आहेत.
> शिवाय शहरामध्ये एकूण १३ ठिकाणी नाकाबंदी पॉईन्ट लावण्यात आले आहेत.
> ०६ स्ट्रायकिंग फोर्स तयार करण्यात आला आहे.
> ०४ आरसीपी पथके तैनात करण्यात आली आहेत.
> गुन्हे शाखेची ०६ पथके शहरामध्ये गस्ती करता नेमण्यात आली आहेत.
> याचबरोबर मुलींच्या रक्षणाकरिता दामिणी पथके नियुक्त करण्यात आली आहेत.
> या शिवाय प्रत्येक पोलीस ठाणेस पिसीआर मोबाइल, बिट मार्शल, यांची सतत पेट्रॉलिंग राहणार आहे.
> ३१ डिसेंबर च्या अनुषंगाने गोपनीय शाखेची स्वतंत्र साध्या वेषामध्ये गस्त असणार आहे.
यामध्ये (०१) मद्य प्राशन करुन वाहन चालविणारे (०२) ट्रिपल सिट मो. सायकल बालविणे, (०३) फटाके फोडणे, (०४) सायलेन्सर काढुन गाडी चालविणे (०५) मोठ्याने आरडा-ओरडा करत गाडी चालविणे असे कृत्य करणाऱ्यांवर कायदेशीर कडक कारवाई करण्यात येणार आहे.
३१ डिसेंबरच्या रात्री लोक विशेषतः तरुण-तरुणी मोठ्या प्रमाणावर सहभागी होऊन नुतन वर्षाच्या स्वागताचे कार्यक्रामाचे आयोजन करतात. उत्साहामध्ये तरुण मुले-मुली रात्रीच्यावेळी रस्त्यावरुन पायी तसेच वाहनावर गटा-गटाने फिरतात. नववर्षाचे स्वागत करणारे अतिउत्साही काही लोकांमुळे तसेच मद्यप्राशन करुन वेगाने वाहन चालविणाऱ्या लोकांमुळे अपघात होऊ शकतात त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेऊन, आनंदात ३१ डिसेंबर साजरा करावा.