संत एकनाथांच्या नाथषष्ठी सोहळ्यात अधिकाऱ्यांनी वारकरी म्हणून काम करावे ; जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचे आवाहन
संत श्री एकनाथ महाराज 425 वा नाथषष्ठी यात्रा महोत्सव 31 मार्च रोजी आहे. जवळपास 375 दिंड्या व लाखो वारकरी भक्त पैठण येथे येत असतात.
त्याचे नियोजन करण्यासाठी 6 मार्च रोजी पैठण येथे पालकमंत्री संदीपान भुमरे यांचे अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. येणाऱ्या नाथषष्ठी निमित्त पैठण येथे अधिकाऱ्यांनी वारकरी म्हणून काम करावे असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले.
३१ मार्च ते २ एप्रिल रोजी होणाऱ्या नाथषष्ठी सोहळ्याच्या पूर्व नियोजनाची बैठक पालकमंत्री संदीपान भुमरे, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, ग्रामीण पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया, अप्पर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे, उपविभागीय अधिकारी नीलम बाफना, तहसीलदार सारंग चव्हाण, गटविकास अधिकारी संजय कुलकर्णी , उपविभागीय पोलिस अधिकारी सिद्धेश्वर भोरे , पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.
जिल्हाधिकारी दिलीप स्वामी म्हणाले, एकमेकास सहाय्य करू नाथषष्ठी आनंदाने साजरी करु असे सांगून जिल्हा प्रशासन पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली नाथषष्ठी महोत्सव नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडेल.
शहरात विसावा करणाऱ्या जागेची साफसफाई करणे, दिंड्यांसाठी पाणी टँकर वेळेवर पाठविणे, गोदावरी पात्रातील पाणी तात्काळ सोडून वाळवंट रिकामे करणे. जायकवाडी पंप हाऊसवर व पैठण शहरातील विद्युत व्यवस्था चोख ठेवणे आरोग्य खात्याने औषधी व्यवस्था करणे, एसटी विभागाने विशेष बसेसची व्यवस्था करणे, यात्रा कालावधीत पैठण ते संभाजीनगर मुख्य रोडवरील जड वाहनासह सद्यस्थितीत चालू असलेली कामे बंद ठेवणे . यात्रा कालावधीत वाळवंटातील दिंड्यात पाणी घुसणार नाही असे नियोजन करून पाणी सोडणे. ज्ञानेश्वर उद्यानातील ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनावरील छायांकित हॉल उघडा ठेवणे. वाळवंट रिकामे झाल्याची खात्री करून पुन्हा गोदावरी पात्र पुर्णतः पाण्याने भरून घेणे, जायकवाडी येथील पाणी पुरवठा पंपहाऊस सुसज्ज ठेवणे अदि बाबींवर बैठकीत चर्चा झाली.